अपघात झाला त्यावेळी बसमध्ये ३० ते ४० प्रवासी होते, अशी माहिती आहे. काही प्रवाशांना बसमधून बाहेर काढण्यात यश आले असून, काही प्रवासी बसमध्ये अडकल्याचे समजते. या अपघातातील मृतांचा आकडा अद्याप समजू शकलेला नाही.
ही बस कन्नौजमधील गुरसहायगंज येथून जयपूरला जात होती. मुख्यमंत्री यांनी या अपघाताची दखल घेतली असून, कन्नौजच्या जिल्हाधिकारी आणि पोलिसांना घटनास्थळी तातडीने जाऊन प्रवाशांना सुरक्षा आणि वैद्यकीय सुविधा पुरवण्याचे निर्देश दिले आहेत.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हा अपघात रात्री ८ वाजताच्या सुमारास घडल्याचे समजते. हा अपघात झाला, तेव्हा बसमधील प्रवासी झोपले होते. त्यामुळे प्रवाशांना पटकन बाहेर पडता आले नाही, अशी माहिती मिळाली आहे.
अद्याप मृतांचा आकडा समजला नसून, प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार यात अनेकजण अडकले असण्याची शक्यता आहे, अशी माहिती कानपूर विभागाचे पोलीस महानिरीक्षक मोहित अग्रवाल यांनी दिली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, जीटी रोड महामार्गावर ग्राम घिलोई भागात ट्रक आणि बसमध्ये समोरासमोर धडक झाली. या अपघातानंतर दोन्ही वाहनांना आग लागली, असेही अग्रवाल यांनी सांगितले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times