म. टा. प्रतिनिधी ।

वाढत्या संसर्गामुळे सांगलीकरांची चिंता वाढली आहे. गेल्या महिनाभरात जिल्ह्यात जवळपास सहा पट रुग्ण वाढले, तर सात पटीने मृत्यूदर वाढला. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार लोकसंख्येच्या तुलनेत रुग्णांच्या मृत्यूदरात सांगली जगात सर्वात पुढे पोहोचली आहे. सांगली जिल्ह्यातील मृत्यू दर ४.०६ टक्के एवढा झाल्याने आरोग्य यंत्रणांसमोरील आव्हान वाढले आहे. ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरच्या कमतरतेमुळे जिल्ह्यातील स्थिती आणखी बिघडण्याचा धोका निर्माण झाला आहे.

करोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून जुलै महिन्यापर्यंत परिस्थिती नियंत्रणात राखण्यात सांगली जिल्हा प्रशासनाला यश आले होते. रुग्णांच्या स्वॅब तपासणीनंतर तातडीने दिले जाणारे उपचार आणि कंटेन्मेंटच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे संसर्ग रोखण्यात यश मिळाले होते. ऑगस्ट महिन्यात मात्र जिल्ह्यात झालेला करोनाचा उद्रेक जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांच्या हाताबाहेर गेल्याची स्थिती आहे. २७ जुलै रोजी जिल्ह्यात करोनाचे एकूण १७६२ रुग्ण होते, तर उपचारादरम्यान ५७ रुग्णांचा मृत्यू झाला होता. दहा ऑगस्टला रुग्णांची संख्या ४८६९ एवढी झाली. १० ऑगस्टपर्यंत रुग्णांच्या मृत्यूदरात तिप्पट वाढ झाली. २७ ऑगस्टला जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ९९४१ एवढी झाली असून, करोनाबळींची संख्या ४१२ एवढी झाली आहे. गेल्या महिनाभरात रुग्णांची संख्या सहा पटीने वाढली, तर बळींची संख्या सात पटीने वाढल्याने जिल्ह्यात करोना संसर्गाची दहशत निर्माण झाली आहे.

जगातील करोना बळींचा दर सध्या ३.४३ टक्के आहे. भारतात १.८३, तर महाराष्ट्रात हा दर ३.२१ टक्के आहे. सांगलीचा दर सर्वात जास्त ४.०६ टक्क्यांवर पोहोचला आहे. लोकसंखेच्या तुलनेत जगात सर्वात जास्त मृत्यूदर सांगलीत असल्याने आरोग्य यंत्रणांची तारांबळ उडाली आहे. गंभीर रुग्णांना वेळेत ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर मिळत नसल्यानेच मृत्यूदर वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. जिल्ह्यात सध्या ४७७ रुग्णांची स्थिती चिंताजनक आहे. यावरून मृत्यूदर वाढण्याचा धोका स्पष्ट होतो. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६१.१७ टक्के आहे. या स्थितीत सुधारणा करण्याचे आव्हान आरोग्य यंत्रणांसमोर उभे ठाकले आहे.

करोना मृत्यूदर

जग – ३.४३
भारत – १.८३
महाराष्ट्र – ३.२१
सांगली जिल्हा – ४.०६

उपचारासाठी रुग्णांची धावाधाव

खासगी रुग्णालये आरक्षित करूनही पुरेशा खाटा उपलब्ध नाहीत. रुग्णांना सहा-सात रुग्णालयांमध्ये जावे लागते. बहुतांश ठिकाणी खाटा शिल्लक नसल्याचे सांगितले जाते. यामुळे अनेक रुग्णांवर घरीच उपचार केले जात आहेत. गंभीर रुग्णांना ऑक्सिजनयुक्त खाटा आणि व्हेंटिलेटर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. यामुळेच खासदार संजय पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला धारेवर धरून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मृतदेहांसह ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

वाचा:

जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ९९४१ वर

जिल्ह्यात आत्तापर्यंत करोनाचे ९ हजार ९४१ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ४१२ रुग्णांचा मृत्यू झाला. ६ हजार ४८ जण करोनामुक्त झाले आहेत. सद्यःस्थितीत जिल्ह्यात ३ हजार ४८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील ४७७ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. बाधित रुग्णांपैकी १ हजार ६१० होम आयसोलेशनमध्ये आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here