मुंबई: करोनावर मात केल्यानंतर पुन्हा करोना होत असल्याचं उघड झाल्यानंतर आता शरीरातील अँटिबॉडिजबाबतही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मुंबईतील जेजे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सच्या स्टाफवर करण्यात आलेल्या सर्व्हेतून करोनावर मात केल्यानंतर फक्त काही महिनेच शरीरात अँटिबॉडिज राहतात असं आढळून आलं आहे. त्यामुळे करोनाची लस तयार करण्यासाठी संशोधनातून पुढे आलेली ही माहिती अत्यंत उपयोगी ठरणार आहे.

अँटिबॉडिज या शरीरातील प्रतिरोधक प्रणालीचा एक भाग आहेत. इम्युनोग्लोब्यूलिंस नावच्या प्रोटिन्सचं तत्व त्यात असतं. अँटिडबॉडिजला अँटिजनही म्हणतात. सर्च बटालियनच्या स्वरुपात अँटिबॉडिज शरीरात काम करत असतात. वेगवेगळ्या अँटिजेनसाठी वेगवेगळ्या अँटिबॉडिज असतात. शरीरातील कोशिकांमधून निघून अँटिजन शोधून त्याला या अँटिबॉडिज चिपकतात आणि या अँटिजनला मारण्याचं काम करतात. एखाद्या रोगावर शरीराने मात केल्यानंतर त्या रोगाविरोधातील अँटिबॉडिज शरीरात तयार होतात. त्यामुळे भविष्यात त्याच आजारापासून तयार होणाऱ्या इन्फेक्शन विरोधात या अँटिबॉडिज प्रतिकारशक्ती म्हणून काम करत असतात.

सात आठवड्यापूर्वी जेजे, जीटी, आणि सेंट जॉर्ज रुग्णालयात ८०१ हेल्थवर्कर्सपैकी २८ जणांना आरटी-पीसीआर टेस्टमध्ये करोनाची लागण झाल्याचं आढळून आलं. मात्र जूनमध्ये झालेल्या सर्व्हेक्षणात यापैकी एकाच्याही शरीरात अँटिबॉडिज आढळून आल्या नाहीत, असं या संशोधनाचे प्रमुख डॉ. निशांत कुमार यांनी सांगितलं.

तर जेजे हॉस्पिटलमधील ३४ लोकांचं सीरो सर्व्हेक्षण करण्यात आलं. त्यानंतर तीन आणि पाच आठवड्यांपूर्वी त्यांची पीसीआर टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आली. त्यापैकी क्रमश: ९० टक्के आणि ३८.५ टक्के लोकांमध्ये अँटिबॉडिज आढळून आल्या नाहीत. याचा अर्थ त्यांच्या शरीरातील अँटिबॉडिज संपुष्टात आल्या होत्या. या रिपोर्टचा अभ्यास केल्यानंतर करोनावर मात केल्यानंतर शरीरात निर्माण झालेल्या अँटिबॉडिज काही महिन्यानंतर पुन्हा संपुष्टात येतात, असं आढळून आलं आहे. संसर्ग झाल्यानंतर तीन आठवड्यानंतर शरीरात सर्वाधिक अँटिबॉडिज निर्माण होतात आणि त्या लवकर संपुष्टातही येतात, असं जगभरातील संशोधनातूनही स्पष्ट झालं आहे.

अँटिबॉडिज बाबत सर्व्हेक्षणातून आलेली माहिती खरी मानल्यास रुग्णाला करोनाची लस दिल्यास लसीचा प्रभाव केवळ ५० दिवसच राहत असल्याचं सिद्ध होतं. म्हणजे लस टोचल्यानंतर ५० दिवसानंतर शरीरातील अँटिबॉडिज नष्ट होतात आणि त्यामुळे करोना होण्याचा धोका अधिक संभवतो. त्यामुळे आपल्याला लसीच्या रणनितीवर अधिक काम केलं पाहिजे, हे यावरून स्पष्ट होतं, असं निशांत कुमार म्हणाले. तर काही तज्ज्ञांच्या मते आता रुग्णांना केवळ एक डोस देऊन चालणार नाही. तर अनेक डोस घ्यावे लागतील, तरच ते करोनावर मात करू शकतात.

मात्र, या सिद्धांताशी काही आरोग्य तज्ज्ञ सहमत नाहीत. ज्या २८ लोकांना करोनाची लागण झाली होती, त्यांना करोनाची कोणतीही लक्षणे जाणवत नव्हती हे आम्हाला माहीत आहे. ज्यांना करोना झाला आणि त्यावर ज्यांनी मात केली, अशा रुग्णांच्या शरीरात चार महिन्यांपर्यंत अँटिबॉडिज कार्यरत होत्या हे पाश्चत्य देशातील संशोधनातून सिद्ध झालं आहे, असं पब्लिक हेल्थ फाऊंडेशन ऑफ इंडियाचे तज्ज्ञ गिरीधर बाबू यांनी सांगितलं.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here