मुंबई : ठाण्यातील बांदोडकर आणि जोशी-बेडेकर महाविद्यालयात एनसीसीच्या विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून या निर्दयी घटनेसंदर्भात सरकार कडक कारवाई करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली.

बांदोडकर आणि जोशी-बेडेकर कॉलेजमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओत कॉलेजमधील एनएनसी सरावादरम्यान एका सिनिअर कॅडेडकडून विद्यार्थ्यांना शिक्षा म्हणून पावसात जमिनीवर डोके टेकवून आणि हात मागे बांधून उभे करण्यात आले होते. शिवाय, या विद्यार्थ्यांना अमानवी प्रकारे मारहाण करण्यात आली. ठाण्यात एनसीसी विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शुक्रवारी ठाणेनगर पोलिसांनी स्वत:हून अदखलपात्र गुन्हा दाखल केला. परंतु शुक्रवारी दिवसभर विविध राजकीय पक्षांनी महाविद्यालयासमोर आंदोलने केल्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था राखत परिस्थिती नियंत्रणात आणली.

आंदोलनासाठी बेंगळुरूमधून पैसा येतोय पण बारसू रिफायनरी होणारच, फडणवीसांनी ठणकावून सांगितलं
दरम्यान जोशी-बेडेकर महाविद्यालयात एनसीसीच्या विद्यार्थ्यांना झालेल्या अमानुष मारहाणीचे गंभीर पडसाद शुक्रवारी विधानसभेत उमटले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित करत सरकारचे लक्ष वेधले. एनसीसीच्या विद्यार्थ्यांमध्ये कडक शिस्त असावी हे मान्य, पण विद्यार्थ्यांना काठीने मारहाण करणे ही कुठली शिस्त, असा प्रश्न करत वडेट्टीवार यांनी याप्रकरणी राज्य सरकारने गंभीर दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी केली. यावेळी अजित पवार यांनी सरकार कडक कारवाई करेल, असे आश्वासन दिले.

या प्रकरणी तक्रार आल्यानंतर चौकशी करून आणखी गुन्हा दाखल करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त गणेश गावडे यांनी सांगितले. दरम्यान, ज्या पाइपने विद्यार्थ्यांना मारहाण केली जात होती. तो पोकळ प्लास्टिक पाइप होता, याबाबत पुढील चौकशी सुरू असल्याचे गावडे यांनी सांगितले.

शरद पवारांचा निष्ठावान असलो तरी उद्धव ठाकरेंचा भगवा महापालिकेवर फडकवणारच, आव्हाडांची गर्जना
एनसीसी कॅडेट्सच्या मारहाणीचा प्रकार दुर्दैवी आहे. त्यावर विद्यापीठ समिती, प्राचार्यांची समिती, सुरक्षा समिती, एनसीसीची समिती, पोलिस प्रशासन अशा निरनिराळ्या पाच समित्यांच्या माध्यमातून चौकशी करण्यात येणार आहे. यासंदर्भात पुढील कार्यवाही केली जाईल. महाविद्यालयाकडून प्रत्येक विद्यार्थ्याच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन न्याय देण्याचा नेहमीच प्रयत्न केला जातो. परंतु या एका घटनेवरून सुरू झालेले राजकारण महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि कर्मचारी सर्वांचे मन विचलित करणारे होते.

– महेश बेडेकर, विश्वस्त, विद्या प्रसारक मंडळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here