पहिली घटना कळमन्यातील जुना पारडी नाका परिसरातील सुरेंद्र अपार्टमेंट येथे गुरुवारी दुपारी उघडकीस आली. निखिल महेश अग्रवाल (वय २८) हा पुण्यातील एका कंपनीत अभियंता होता. करोनामुळे मार्च महिन्यात लॉकडाऊन झाले. निखिल याला नोकरी गमवावी लागली. तो नागपुरात परतला. नोकरी गेल्याने निखिल हा तणावात होता. गुरुवारी दुपारी निखिल याने साडीने गळफास घेतला. नातेवाइकांना तो गळफास लावलेला दिसला. नातेवाइकांनी फास काढून निखिल याला आधी खासगी रुग्णालयात नेले. येथील डॉक्टरांनी त्याला मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास सांगितले. नातेवाइकांनी निखिल याला मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
दुसरी घटना सीताबर्डीतील मरियमनगर येथे गुरुवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. संजय गणेश आठवले (वय ४८) हे पानठेला चालवायचे. लॉकडाऊनमुळे पानठेला बंद झाला. त्यांना आर्थिक चणचण निर्माण झाली. त्यामुळे ते तणावात असायचे. गुरुवारी आठवले यांच्या नातेवाइकांकडे कार्यक्रम होता. कार्यक्रमासाठी ते पत्नी व मुलाला घेऊन नातेवाइकाकडे गेले. तेथून एकटेच घरी परतले. लाकडी बल्लीला चादर बांधून गळफास घेतला. त्यांच्या पत्नी घरी परतल्यानंतर ही घटना उघडकीस आली. तिसरी घटना बेल्यातील सालईराणी येथे घडली. लॉकडाउनमुळे योगेश प्रकाश मात्रे वय २५ हा बेरोजगार झाला. बेरोजगारीला कंटाळून त्याने पंख्याला दोरी बांधून गळफास घेतला.योगेश हा खासगी काम करायचा. तिन्ही प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times