मुंबई : वयाच्या साठीनंतर आर्थिक सुरक्षा पुरविणाऱ्या अटल पेन्शन योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ऐन एप्रिल आणि मे महिन्यात देशात कठोर लॉकडाउन असून देखील अटल पेन्शन योजनेत नव्याने सभासद होणाऱ्यांची संख्या लाखाने वाढली आहे. नुकताच केंद्र सरकारने ही योजना अधिक आकर्षित आणि सुलभ करण्यासाठी एक बदल केला होता. त्यामुळे विद्यमान २ कोटींहून अधिक सभासदांसाठी योजनेती गुंतवणूक सुटसुटीत झाली आहे.

अटल पेन्शन योजनेचे व्यवस्थापन करणाऱ्या पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने (PFRDA) दिलेल्या माहितीनुसार एप्रिलपासून या योजनेत जवळपास २० लाखांहून अधिक नवे सभासद झाले. तसेच या योजनेतील एकूण निधी पुढील महिनाभरात पाच लाख कोटीपर्यंत वाढेल, असे PFRDAचे अध्यक्ष सुप्रतिं बंडोपाध्याय यांनी सांगितले.

यापूर्वी या योजनेत सभासदाला केवळ एप्रिल महिन्यातच आपल्या प्रिमियमच्या रकमेत (गुंतवणूक रक्कम) बदल करण्याची परवानगी होती. मात्र आता हा नियम शिथिल करण्यात आला होता. आता या योजनेतील पेन्शनधारक वर्षातील कोणत्याही महिन्यात त्याची प्रिमियमची रक्कम कमी किंवा वाढवू शकतो, असे पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने म्हटलं आहे. हा नियम शिथिल केल्याने ही योजना अधिक आकर्षक बनली आहे. हा बदल १ जुलैपासून लागू झाला आहे.

‘PFRDA’च्या सूचनेनुसार अटल पेन्शन योजनाधारक त्यांच्या वयानुसार वर्षातील कोणत्याही महिन्यात प्रिमियमची रक्कम कमी किंवा वाढवू शकतात. वयाच्या ६० वर्षांपर्यंत या योजनेत सभासदाला प्रिमियम भरायचा आहे. सध्या देशभरात अटल पेन्शन योजेनेचे २ कोटी २८ लाख सभासद आहेत. करोनाच्या संकटात अटल पेन्शन योजनेच्या सभासदांना तीन महिने प्रीमियम भरण्यापासून सूट देण्यात आली होती. मात्र आता १ जुलैपासून प्रीमियम पूर्ववत करण्यात आले असल्याचे पीएफआरडीएने म्हटलं आहे. चालू वर्षाचा प्रीमियम सभासदांच्या खात्यातून वजा केले जाणार आहे. एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत प्रिमियम ३० सप्टेंबरपर्यंत कोणत्याही दंडाशिवाय स्वीकारला जाईल, असे प्राधिकरणाने म्हटलं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here