म. टा. विशेष प्रतिनिधी, पुणे : केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा यांनी शनिवारी रात्री आपल्या पुण्यातील मुक्कामादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा केली असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही तातडीने रात्रीच पुण्यात बोलावून घेण्यात आल्याचे समजते. शहा यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी मंत्रिमंडळाच्या विस्तारासह आगामी लोकसभा निवडणुकीच्या संभाव्य जागा वाटपावर खलबते केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

पंतप्रधांनापाठोपाठ गृहमंत्री

पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यासाठी पुण्यात आले होते. त्यांच्यापाठोपाठ आता अमित शहा पुणे दौऱ्यावर आले आहेत. केंद्रीय सहकार संस्था निबंधक कार्यालयाने ‘सहकारातून समृद्धी’ संकल्पनेअंतर्गत संकेतस्थळ विकसित केले आहे. शहा यांच्या हस्ते रविवारी दुपारी या संकेतस्थळाचे उद्घाटन होणार आहे. हवाई दलाच्या विशेष विमानाने शनिवारी सायंकाळी शहा पुण्यात दाखल झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उत्पादन शुल्कमंत्री शंभुराज देसाई, माजी खासदार संजय काकडे आदींनी त्यांचे स्वागत केले.

कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी; गणपती काळात मुंबईतील ‘या’ स्थानकातून सवलतीच्या दरात एसटी फेऱ्या

स्वतंत्ररित्या चर्चा

शहा पुण्यात पोहोचल्यानंतर नातेवाइकांच्या भेटीसाठी बिबवेवाडी परिसरातील त्यांच्या घरी गेले होते. त्यानंतर ते सेनापती बापट रस्त्यावरील पंचतारांकित हॉटेलमध्ये परतले असून, या ठिकाणी त्यांनी मुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्याशी चर्चा केली. फडणवीस रविवारी पुण्यात येणार होते. मात्र, त्यांनाही तातडीने रात्रीच पुण्यात येण्याच्या सूचना दिल्याचे समजते. त्यानुसार फडणवीस रात्रीच सेनापती बापट रस्त्यावरील त्या हॉटेलमध्ये उतरणार आहेत. तेथे दोघांत स्वतंत्र चर्चा होणार असून, त्यानंतर शहा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी एकत्र संवाद साधणार असल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

रणनीतीचा मुद्दा

शहा यांच्या बैठकांमध्ये आगामी लोकसभा निवडणुकांची रणनीती हा प्रामुख्याने मुद्दा होता. यामध्ये भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस किती आणि कुठल्या जागा लढविणार? संभाव्य उमेदवार कोण असतील, यावर चर्चा अपेक्षित असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर आगामी तीन ते सहा महिन्यांत राज्य सरकारकडून अपेक्षित कामगिरी चर्चेच्या केंद्रस्थानी असल्याचे समजते. राज्यातील लोकसभेच्या ४८ जागांपैकी अधिकाधिक जागा जिंकण्यासाठी भाजपची ही पूर्वतयारी असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.

शहा दिवसभर पुण्यातच

केंद्रीय सहकार संस्था निबंधक कार्यालयाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन शहा यांच्या हस्ते केले जाणार आहे. त्यानंतर सायंकाळी ते दिल्लीला रवाना होतील. या कार्यक्रमापूर्वी आणि कार्यक्रमानंतर ते राज्यातील प्रमुख नेत्यांशी; तसेच इतर घटकांशी सविस्तर चर्चा करणार आहेत. त्यासाठी इतर जाहीर कार्यक्रम टाळण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here