इस्लामपुरातील प्रकाश हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस म्हणाले, ‘प्रशासनावर कोणाचाच वचक नाही हे दुर्दैवी आहे. करोना रुग्णांच्या बाबतीत देशात महाराष्ट्र हॉटस्पॉट बनले आहे. करोनाचे संकट राजकारणाच्या पलीकडचे आहे. विरोधी पक्ष म्हणून आम्ही सकारात्मक भूमिका घेतली आहे. कधीही टोकाची भूमिका घेतली नाही. सर्वांनी मिळून एकत्रितपणे या संकटाला सामोरे जाण्याची ही वेळ आहे. सांगली जिल्ह्यात कोरोनाचे संकट अधिक गडद होत चालले आहे. सांगलीतील वाढलेला मृत्यूदर ही चिंताजनक बाब आहे. रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी व्यापक प्रयत्नांची गरज आहे. प्रसंगी याबाबत मुख्यमंत्री यांचे लक्ष वेधणार आहे.’
‘राज्यात दररोज १५ हजार नवे रुग्ण वाढत आहेत. सरकारने टेस्टिंगसह ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची व्यवस्था वाढवायला हवी. होम आयशोलेशनचे नियोजन हवे. जिथे रुग्णालयात व्यवस्था आहे, तिथे नव्याने तातडीने परवानग्या देऊन सुविधा वाढवायला हव्यात. जनतेला त्रास झाला तर लोकप्रतिनिधी आक्रमक भूमिका घेणार हे निश्चित आहे,’ असं फडणवीस म्हणाले. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, आदी उपस्थित होते. दरम्यान, फडणवीस शनिवारी सांगली आणि मिरज शहरातील करोना स्थितीचा आढावा घेणार आहेत. यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील करोना स्थितीचा आढावा घेऊन जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times