ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मध्य प्रदेश, ओडिशा येथे तीव्र अतिरिक्त पाऊस नोंदला गेला. उत्तर प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, नागालँड या राज्यांमध्ये अतिरिक्त पावसाची नोंद झाली. अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, त्रिपुरा, उत्तराखंड, दिल्ली येथे सरासरीच्या श्रेणीत पावसाची नोंद झाली. उर्वरित भारतात जम्मू आणि काश्मीर, हरियाणा, बिहार, मेघालय, आसाम, मणिपूर, मिझोराम, महाराष्ट्र या राज्यांमध्ये पावसाची तूट २० ते ५९ टक्क्यांदरम्यान आहे. हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान, गुजरात, तेलंगणा, गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, केरळ या राज्यांमध्ये ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पावसाची तूट ही ६० टक्क्यांहूनही अधिक आहे.
राज्यात सर्वच जिल्ह्यांत तूट
राज्यात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अपेक्षित पाऊस न पडल्याने ५३ टक्के तूट नोंदली गेली. राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट आहे. मुंबई शहर आणि उपनगर या जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्र तूट नोंदवली गेली. यासोबतच पालघर, नगर, सोलापूर, जालना, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलडाणा, अकोला, यवतमाळ, अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पावसाची तूट ही तीव्र म्हणजे ६० टक्क्यांहून अधिक आहे. जुलैमध्ये पडलेल्या पावसाने हंगामाची सरासरी आत्तापर्यंत मुंबई उपनगर, रायगड, ठाणे, पालघर, नांदेड, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये अतिरिक्त राखली आहे. हंगामी सरासरी सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि हिंगोली येथे २० टक्क्यांहून अधिक तुटीची आहे.
या आठवड्यातील पावसाची स्थिती काय?
मुंबईमध्ये सोमवारपासून पुढील चार ते पाच दिवस तीव्र पाऊस पडण्याची शक्यता नाही. येत्या चार ते पाच दिवसांमध्ये हलका ते मध्यम पाऊस असेल, असे प्रादेशिक हवामान विभागाने म्हटले आहे. मध्य आणि दक्षिण भारतातही कमी पावसाची शक्यता आहे. कोकण विभागातही अति जोरदार पद्धतीने कोसळलेल्या पावसाची तीव्रता या आठवड्यात कमी होईल, असा अंदाज निवृत्त हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला. महाराष्ट्रातील धरणांमध्ये सुमारे ७० टक्के पाणी असून आता पावसाची प्रतीक्षा करावी लागण्याची चिन्हे आहेत. यामुळे धरणे १०० टक्के भरण्यासाठी वेळ लागेल. खरीप पिकांना पावसाअभावी ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात ओढ बसण्याचीही शक्यता त्यांनी वर्तवली. खरीपाप्रमाणे रब्बी पिकांच्या नियोजनासाठी सावधानता आवश्यक असल्याची माहिती त्यांनी दिली.