म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : पावसाळ्यातील समुद्रातील दुर्घटनांचे सत्र सुरूच असून, शनिवारी रात्री वर्सोवा समुद्रात मासेमारी करून परत येत असताना एक मच्छिमार बोट बुडाली. यातील तीन जणांपैकी एकाने पोहत किनारा काढला, तर एकाचा मृतदेह रविवारी दुपारी आढळला. आणखी एकाचा शोध अद्याप सुरू आहे.

वर्सोवा गावातील देवाची वाडीमधील विजय बमानिया (३५), उस्मानी भंडारी (२२) आणि विनोद गोईल (४५) हे समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेले होते. शनिवारी रात्री ते परतत असताना त्यांची बोट वर्सोवा किनाऱ्यापासून तीन किमी अंतरावर बुडाली. यातील विजय बमानिया याने पोहत मढ किनारा गाठला आणि झालेला प्रकार ग्रामस्थांना सांगितला. ग्रामस्थांनी याची माहिती पोलिस आणि अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर अग्निशमन दल, तटरक्षक दल, जीवरक्षक, स्थानिक मच्छिमारांनी बुडालेल्या उस्मानी भंडारी आणि विनोद गोईल यांचा शोध सुरू केला. दरम्यान, यातील विनोद गोईल याचा मृतदेह रविवारी दुपारी चारच्या सुमारास जुहू किनाऱ्याजवळील गोदरेज बंगल्याजवळ आढळला, अशी माहिती जुहू येथील जीवरक्षक मनोहर शेट्टी व सोहेल मुलानी यांनी दिली. उस्मानी भंडारी याचा शोध सुरू आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये आर्थिक गैरव्यवहार, औषध खरेदी कंत्राटदारांविरोधात मोठी कारवाई

भरतीमुळे मदतकार्यात अडथळा

शनिवारी रात्रीपासून अग्निशमन दल, जीवरक्षक आणि स्थानिक मच्छिमार तसेच नौदलाच्या हेलिकॉप्टरमधून शोध सुरू होता. दोरखंड, हुक आणि विविध प्रकारच्या साहित्यांचा वापर करण्यात आला. मात्र, समुद्राला आलेल्या भरतीमुळे रविवारी दुपारी १ वाजता शोधमोहीम थांबवण्यात आली, अशी माहिती अग्निशमन दलातर्फे देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here