कोल्हापूर: हेमाडपंती कोपेश्वर मंदिरामुळे भारतभर प्रसिद्ध असलेल्या खिद्रापूरकरांच्या मदतीला थेट अभिनेता धावून आला आहे. गतवर्षी महापुरात पडझड झालेल्या ७० घरांचे बांधकाम सलमान हा ‘ऐलान’ फाउंडेशनच्या मदतीनं करून देणार असून त्या कामाला सुरुवातही झाली आहे. सलमानच्या या आगळ्यावेगळ्या सामाजिक बांधिलकीने खिद्रापुरकरांच्या चेहर्‍यावर आनंदचे हास्य पसरले.

गेल्या वर्षी जिल्ह्यात प्रचंड महापूर आला. यामध्ये शिरोळ तालुक्यातील अनेक गावे पाण्याखाली गेली. यामुळे अनेक घरांची पडझड झाली. यातून अनेकांचे संसार उघड्यावर पडले. पिके पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अनेकांचा व्यवसाय बुडाला. उद्योगावर मोठा परिणाम झाला. या सर्व पार्श्वभूमीवर शिरोळ तालुक्यात मोठी हानी झाल्यामुळे तालुक्यातील जनजीवनच विस्कळीत झाले. अशावेळी या तालुक्यातील गावातील पडलेली सर्व घरे बांधून देण्यासाठी अभिनेता सलमान खान धावून आला. त्याने ‘ऐलान’ फाउंडेशनच्या माध्यमातून घरे बांधून देण्याचा शब्द दिला आणि या घरांचे बांधकाम सुरू करण्यात आले.

राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आण जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते या बांधकामाचा भूमिपूजन समारंभ नुकताच झाला. काही महिन्यात ही घरे ताब्यात देण्यात येणार आहेत. या घरांसाठी राज्य सरकारकडून प्रत्येकी ९५ हजार रुपयांची मदत देण्यात आलेली आहे. बांधकामासाठी उर्वरित होणारा सर्व खर्च सलमान खान करणार आहे.

याबाबत बोलताना गावचे सरपंच हैदरखान मोकाशी म्हणाले, आमच्या दृष्टीने हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यात असलेल्या या गावाची दखल सलमान खानने घेतली आणि मदतीचा हात पुढे केला. यामुळे त्याच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे.

या बांधकामाची जबाबदारी घेतलेल्या ‘ऐलान’ फाउंडेशनचे प्रमुख आकाश कपूर म्हणाले, महापुरात या गावात ज्यांची घरे पडली आहेत, त्या सर्वांना २५० चौरस फूट आकाराचे स्लॅबचे घर बांधून देण्यात येईल.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here