श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी राष्ट्रपुरुषांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त होत होता. पुरोगामी संघटनांनी विविध जिल्ह्यात भिडे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करत आंदोलनही केली. यानंतर भिडेंवर राज्यातल्या काही पोलीस ठाण्यात गुन्हेही दाखल करण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी योग्य ती कारवाई होईल असे सांगितले होते. राज्यात संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावरून वाद पेटला असतानाच सांगलीत मात्र वेगळे चित्र आहे. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे आणि माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांची भिडे यांच्या निवासस्थानी गुप्त भेट झाली. सकाळच्या सुमारास सुमारे अर्धा तासहून अधिक वेळ दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली.
सध्या सुरू असणाऱ्या राजकीय घडामोडींमुळे या चर्चेला खूप महत्त्व आले आहे. पृथ्वीराज देशमुख हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती असल्याने. फडणवीस यांचा निरोप घेऊन आले असावेत अशी चर्चा जोरदार रंगली होती. दोघांच्या भेटीबाबत कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली होती. या संदर्भात पृथ्वीराज देशमुख यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी संभाजी भिडेंची सदिच्छा भेट घेतली असल्याचे सांगितले. मात्र, काही दिवसांपूर्वीच भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी संभाजी भिडे यांनी केलेला वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती त्यानंतर भाजपच्या माजी आमदाराने त्यांची भेट घेतल्याने तर्कवितर्कांना उधान आले होते.