म. टा. प्रतिनिधी, पुणे :‘भारतीय जनता पक्षाला चोरांच्या मांडीला मांडी लावून बसण्यात परमोच्च आनंद मिळतो की काय? काल परवा ज्यांना चोर-डाकू म्हणत होते, त्याच टोळीत घुसून मलिदा खाण्याची प्रवृत्ती पुढे आली काय,’ असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी रविवारी केला. राज्यातील तोडफोडीचे राजकारण जनतेला अजिबात पटलेले नाही. जनता निवडणुकीची वाट बघत असल्याचेही वडेट्टीवार म्हणाले.

पुण्यातील एका कार्यक्रमानंतर वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘काही पक्षातून लोक बाहेर गेले आहेत; पण त्याचा त्या पक्षावर परिणाम होईल असे अजिबात वाटत नाही. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे फक्त दोनच खासदार निवडून येणार आहेत, हे सर्वेक्षणातून पुढे येत आहे. अजित पवार गटाचेही असेच होईल,’ असे वडेट्टीवार म्हणाले. ‘अजितदादा हा मैत्रीसाठी दिलदार माणूस आहे; पण सत्तेचाही पक्का आहे. त्यामुळे मैत्री आणि सत्ता त्यांना अबाधित राहो,’ असा टोलाही वडेट्टीवार यांनी लगावला.

भुजबळ ओबीसींचे नेते राहिले नाहीत

‘छगन भुजबळ भाजपसोबत जातील, त्यांच्या तोंडी मोदींचे नाव येईल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. ही सत्तेची लाचारी आहे, ते आता इतर मागासवर्गीयांचे (ओबीसी) नेते राहिलेले नाहीत. भविष्यात त्यांना राजकीय संकटांना सामोरे जावे लागेल,’ असे वडेट्टीवार म्हणाले.

औरंगजेबाच्या २ हिंदू राण्यांना पंडितांनी भ्रष्ट केलं, सतीप्रथा बंद करणारा तो पहिला राजा होता: भालचंद्र नेमाडे
मुख्यमंत्र्यांचा फोटो कार्यकर्त्यांप्रमाणे

‘मुख्यमंत्र्यांचा प्रोटोकॉल देशाच्या गृहमंत्र्यांपेक्षा मोठा असतो; परंतु अमित शहा यांच्या स्वागतासाठी सर्वत्र लावलेल्या फ्लेक्सवर त्यांचे फोटो कार्यकर्त्यांप्रमाणे खाली लावलेले आहेत. यातूनच वैचारिकतेचे अध:पतन दिसून येते,’ अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली.

ताकद नक्की कोणाची?

अजित पवार सत्तेत सहभागी झाल्याने महायुतीची ताकद वाढल्याचा भारतीय जनता पक्षाचा दावा आहे. मात्र, शिवसेना फोडली तेव्हा त्यांना सत्तेत येण्याची शाश्वती नव्हती. आता अजित पवार आल्याने ताकद वाढली असा दावा करण्यात येत असले, तर ती ताकद कुणाची? भाजप, की अजित पवारांची?’ असा सवालही वडेट्टीवार यांनी केला.

‘राज्यातही दंगलींची शक्यता’

‘दंगली कोण आणि का घडवत आहे हे आता उघड झाले आहे. सरकारला दाखवण्यासाठी कुठलेही काम राहिलेले नाही. सर्व सर्वेक्षणे त्यांच्या विरोधात जात आहेत, म्हणून दंगली घडवून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचे सरकार करीत आहे. राज्यातदेखील दंगली घडू शकतात,’ अशी शंकाही वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.

सत्तेसाठी लाचारी, भुजबळ ओबीसी नेते राहिले नाहीत; विजय वडेट्टीवारांचा निशाणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here