बंगळुरू: कर्नाटकच्या तुमकुरु जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. १५ वर्षीय मुलाचा रिले शर्यतीनंतर मृत्यू झाला. हृदयक्रिया बंद पडल्यानं त्याची प्राणज्योत मालवली. भीमाशंकर असं विद्यार्थ्याचं नाव असून त्याचा संघ शर्यतीत दुसरा आला. शर्यत संपल्यानंतर संघातील खेळाडू आपापल्या घराकडे निघाले. त्यावेळी भीमाशंकर अचानक खाली कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. तुमकुरुच्या चिक्काथोट्टालुकेरेमध्ये ही घटना घडली. त्यानंतर भीमाशंकरच्या वडिलांनी कोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. शवविच्छेदनानंतर भीमाशंकरचा मृतदेह त्याच्या आई, वडिलांच्या ताब्यात दिला. हैदराबाद आणि अहमदाबादमध्ये याआधीही अशा घटना घडल्या आहेत. भीमाशंकर हा बेलाधारा ग्रामीण शाळेत इयत्ता दहावीत शिकत होता. तो १२ सदस्यीय संघाचा भाग होता. ‘गुरुवारी संध्याकाळी पावणे सहा वाजता संपलेल्या शर्यतीत दुसरा क्रमांक पटकावला. दुसऱ्या स्थानावर असलेल्या भीमाशंकरनं संघाला आघाडी मिळवून दिली होती. मात्र त्याच्या नंतरच्या खेळाडूंना आघाडी टिकवता आली नाही. भीमाशंकरनं त्याची कामगिरी चोख पार पाडली होती. मात्र संघ सहकाऱ्यांच्या सुमार कामगिरीमुळे पहिला क्रमांक हुकला. त्यामुळे भीमाशंकर नाराज होता. शर्यत संपल्यानंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्यांची दप्तरं घेऊन गाडीत बसण्यास सांगितलं,’ असा घटनाक्रम शाळेचे मुख्याध्यापक नागराजूंनी कथन केला.भीमाशंकरनं स्वत:चं दप्तर उचललं आणि तो मैदानातून निघाला. त्यानंतर संध्याकाळी ६ वाजता तो अचानक कोसळला. त्याला श्रीदेवी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. हृदय क्रिया बंद पडल्यानं त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. भीमाशंकरचे वडील बसवराजू यादगीर जिल्ह्याच्या सुरपुरा तालुक्यातील नागानुरु गावचे रहिवासी आहेत. ते केंचय्यनपाल्यामध्ये वीट भट्टीत काम करतात. भीमाशंकरचा मृतदेह शवविच्छेदनानंतर त्याच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला.