लखनऊ: उत्तर प्रदेशच्या हापूडमधील छिजारसी टोल नाक्यावर तैनात असलेल्या कर्मचाऱ्याच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला. बॅरिकेड तोडून कार चालक तरुणानं टोल कर्मचाऱ्याला धडक दिली. त्यानंतर त्याला चिरडण्याचा प्रयत्न केला. यामध्ये कर्मचारी जबर जखमी झाला. तर आरोपी कार चालक पळून गेला. संपूर्ण घटना टोल नाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.हापूडच्या छिजारसी टोल नाक्यावर एका कार चालकानं बॅरिकेड्स तोडून टोल कर्मचाऱ्याला धडक दिली. त्यानंतर चालकानं त्याला कारखाली चिरडण्याचा प्रयत्न केला. घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. त्यात पांढऱ्या रंगाची कार बॅरिकेड्स तोडताना दिसत आहे. एक कर्मचारी त्या कारला रोखण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी तो कारच्या मागे पळतो. पण अपयशी ठरतो. काही सेकंदांनंतर तो पुन्हा टोल नाक्याच्या दिशेनं चालू लागतो.पुढच्या काही सेकंदांमध्ये पांढरी कार यू-टर्न मारुन येते. वेगात असलेली कार टोल नाक्याच्या कर्मचाऱ्याच्या दिशेनं येते. कार चालक टोल कर्मचाऱ्याला धडक देते. त्यामुळे तो रस्त्यावर पडतो. यानंतर कार चालक त्याला चिरडण्याचा प्रयत्न करतो. घटनाक्रम पाहून टोल नाक्यावरील इतर कर्मचारी पीडिताच्या मदतीसाठी धावतात. यानंतर कार चालक घटनास्थळावरुन पळ काढतो.दुर्घटनेत टोल कर्मचारी गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. आरोपी चालक घटनास्थळावरुन पळून गेला. त्याचा शोध सुरू आहे. घटना रविवारी सकाळी घडल्याचं पिलखुवा पोलीस ठाण्याचे सीओ वरुण मिश्रा यांनी सांगितलं. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून कार चालकाचा शोध सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. आरोपी लवकर पकडला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here