अमरावती: आंध्र प्रदेशच्या आंबेडकर कोनासीमा जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारा व्यक्ती एका महिला आणि तिच्या दोन मुलींना फिरायला घेऊन गेला होता. सुरेश असं त्या व्यक्तीचं नाव असून त्याच्यासोबत सुहासिनी तिची १३ वर्षांची मुलगी कीर्तना आणि एका वर्षांची जर्सी यांच्यासह कारमधून रावुलापलेम ब्रीजवर पोहोचला होता. तिथं त्यानं सेल्फी काढण्याच्या बहाण्यानं तिघींना गोदावरी नदीत ढकलून देण्याचा प्रयत्न केला. यामध्ये दोघी जणी बेपत्ता असून १३ वर्षांची कीर्तना मात्र बचावली आहे. पुलावरुन ढकलल्यानंतर तिनं एका प्लास्टिकच्या पाईपला धरलं आणि ती बचावली. तिनं पाईपला पकडून ठेवत १०० क्रमांकावर फोन करुन पोलिसांची मदत मागितली आणि धैर्य राखल्यानं कीर्तना वाचली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुलावरुन धक्का दिला गेल्यानंतर ती मुलगी पाइप पकडण्यात यशस्वी ठरली. तिनं तिच्या खिशातून फोन काढून १०० क्रमांकावर फोन करुन मदत मागितली. पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी जात तिला वाचवलं. पोलीसदेखील या मुलीच्या धाडसानं आश्चर्यचकीत झाले.

सेल्फी काढण्याच्या बहाण्यानं धक्का दिला

कीर्तनानं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार यू. सुरेश, तिची आई सुहासिनी, एका वर्षांची सावत्र बहीण जर्सी यांच्यासोबत पहाटे चारच्या सुमारास रावुलापलेम ब्रीजवर पोहोचले होते. तिथं सुरेश यानं सेल्फी काढण्याच्या बहाण्यानं पुलावरुन धक्का दिला. सुरेश त्या तिघींना खरेदी करण्यासाठी राजामहेंद्रवरममध्ये घेऊन गेला होता. तिथं खरेदी झाल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी ते गेले होते. ज्यावेळी ते रावुलापलेम गौतमी ब्रीजवर पोहोचले त्यावेळी त्यानं सेल्फी काढण्यासाठी गाडीतून उतरण्यास सांगितलं. ते सर्वजण पुलाच्या कठड्यावर बसले होते आणि अचानक त्यानं धक्का दिला. यामध्ये सुहासिनी आणि जर्सी नदीत वाहून गेली. मात्र, कीर्तनानं पुलाखाली एका पाईपला पकडल्यानं ती वाचली. सुरेश तिथून तिघी वाहून गेल्या असतील या विचारानं निघून गेला. त्यानंतर कीर्तनानं धाडस दाखवलं आणि तिनं पोलिसांना फोन लावला.रावुलापलेमचे पोलीस उप निरीक्षक वेंकटरामना हे त्यांच्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचली आणि त्या मुलीला वाचवलं. दुसरी टीम सुहासिनी आणि जर्सी यांचा शोध घेत तर आणखी एक टीम आरीपचा शोध घेत आहे. गुंटूरमधील ताडेपल्ली येथील सुहासिनी या पतीशी काही कारणांवरुन वाद झाल्यानं वेगल्या राहत होत्या. सुरेश आणि सुहासिनी यांच्यात कोणत्या तरी कारणांमुळं वाद झाला होता. त्या वादामुळं त्यानं तिघींना संपवण्यासाठी कट रचला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here