म.टा. प्रतिनिधी, : शारजाह येथून शरीरामध्ये लपवून आणलेले ५५ लाख किंमतीचे सोने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पकडण्यात आले आहे. सीमा शुल्क विभागाने (कस्टम) शुक्रवारी सकाळी ही कारवाई केली. याप्रकरणी तीन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तीघेही जण दिल्ली येथील रहिवासी आहेत. शारजाह-नागपूर (जी ९४१६) या विमानाचे पहाटे ४.३० ते ५ वाजतादरम्यान नागपूर विमानतळावर आगमन झाले. तिघेही जण एअर अरेबियाच्या विमानाने नागपूरला आले होते. त्यावेळी तस्करीचे सोने आणण्यात येत असल्याची गुप्त माहिती विभागाला मिळाली. त्यानुसार पुढील कारवाई करण्यात आली. तिघांनीही स्वत:च्या शरीरामध्ये सोने लपवून आणले होते. कारवाई अंतर्गत तिघांनाही ताब्यात घेण्यात आले. पुढील तपास सुरू आहे. भल्या पहाटे झालेल्या कारवाईबाबत विभागातर्फे संपूर्ण दिवसभर प्रचंड गुप्तता का पाळण्यात आली, याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

शारजाह विमानतळाचे दुर्लक्ष

जगभरातील विमानतळे अत्याधुनिक झाली आहेत. शारजाह येथील तर नागपूरपेक्षाही अत्याधुनिक आहे. असे असतानाही शारजाह विमानतळावरील अधिकाऱ्यांचे या तस्करीकडे दुर्लक्ष कसे झाले, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. भविष्यात एखादा प्रवासी विमानात स्फोटके घेऊन गेल्यास अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सात वर्षांपूर्वीचाच कित्ता
मार्च २०१३ मध्ये शारजाहहून अवैधरित्या सोने आणणाऱ्या तिघांना सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली होती. त्यावेळी त्यांच्याकडून तीन किलो सोने जप्त करण्यात आले होते. सात वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेतील आरोपीसुद्धा एअर अरेबियाच्या विमानाने आले होते. त्या प्रकरणातील आरोपींनी मांड्यांना लावून व मोज्यांमध्ये सोने लपवून आणले होते. असाच काहीसा प्रकार शुक्रवारीदेखील घडल्याची माहिती पुढे येत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here