म. टा. प्रतिनिधी, पुणे : पोलिस असल्याचे सांगून आर्थिक व्यवहारातून २५ लाख रुपयांच्या खंडणीसाठी तरुणाचे अपहरण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. गुन्हे शाखा आणि उत्तमनगर पोलिसांनी कारवाई करून तरुणाची सांगली जिल्ह्यातील विटा येथून सुटका केली. या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

अक्षय मोहन कदम (वय २८), विजय मधुकर नलावडे (वय २६), महेश मलिक नलावडे (वय २५), बोक्या ऊर्फ रणजित दिनकर भोसले (वय २६), प्रदीप किसन चव्हाण (वय २६), अमोल उत्तम मोरे (वय ३२, सर्व रा. सांगली) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. एनडीए रस्त्यावरील कोंढवे धावडे परिसरातून कारचालक तरुणाचे अपहरण करण्यात आले होते. याबाबत तरुणाच्या पत्नीने उत्तमनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

आमच्यात वादही नाही, गटही नाही, पक्ष एकसंध आहे, शरद पवारांनी निवडणूक आयोगाला काय सांगितलं?

तरुण मूळचा सांगली जिल्ह्यातील असून, तो कॅबचालक आहे. आरोपी अक्षय कदम कारचालक तरुणाच्या ओळखीचा आहे. अक्षयचा सोने-चांदी दागिने विक्रीचा व्यवसाय आहे. कारचालक तरुण त्याच्याकडे कामाला होता. आर्थिक व्यवहारातून त्यांच्यात वाद झाला होता. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात तरुण आणि त्याची पत्नी पुण्यात वास्तव्यास आले. ४ ऑगस्ट रोजी आरोपी अक्षय आणि साथीदार कारचालक तरुणाच्या घरी रात्री ८.३०च्या सुमारास गेले. त्या वेळी त्याची पत्नी घरी होती. आरोपी अक्षयच्या साथीदारांनी पोलिस असल्याचे सांगितले. तरुण घराबाहेर आल्यानंतर अक्षय आणि साथीदारांनी त्याचा मोबाइल ताब्यात घेतला. तरुणाला धमकावण्यात आले. त्याला कारमध्ये जबरदस्तीने बसवून त्याचे अपहरण करण्यात आले.

पोलिसांच्या पथकाने तरुणाची विटा परिसरातून सुटका केली. पोलिस निरीक्षक किरण बालवडकर, नंदकुमार बिडवई, सहायक निरीक्षक अभिजित पाटील, उमेश रोकडे, किरण देशमुख, समीर पवार, सागर हुवाळे, किरण ठवरे, राजेंद्र लांडगे, उज्ज्वल मोकाशी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

नेपाळमधील मोबाइल क्रमांक

आरोपींनी तरुणाच्या पत्नीच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. आरोपी वापरत असलेला मोबाइल क्रमांक नेपाळमधील होता. पतीला सुखरूप सोडायचे असेल, तर तातडीने २५ लाख रुपयांची खंडणी द्यावी लागेल, अशी धमकी आरोपींनी त्यांना दिली. पोलिस कर्मचारी संग्राम केंद्रे यांनी तांत्रिक तपास केल्यानंतर आरोपी विटा परिसरात असल्याची माहिती मिळाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here