लाचखोरीप्रकरणी संशयित बहिरमवर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला रविवारी विशेष न्यायालयाने दोन दिवसांची कोठडी सुनावली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बहिरमची कसून चौकशी सुरू केली. बहिरमची आज कोठडी संपल्यानंतर त्याला बुधवारी (दि. ९) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
दरम्यान, राजूर बहुला येथील एकाच्या जमिनीत मुरूम उत्खननाबाबत मूल्य नियमानुसार पाच पट दंड आणि स्वामित्वधन जागाभाडे मिळून एक कोटी २५ लाख सहा हजार २२० रुपये दंड आकारणीचे आदेश संशयित बहिरमला जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले होते. त्या आदेशाविरुद्ध जमीनमालकाने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अपील दाखल केले. त्यावरून फेरचौकशीसाठी बहिरमकडे हे प्रकरण पाठविण्यात आले.
जमिनीतील उत्खननानंतर मुरमाचा त्याच जागेत वापर झाल्याचे मालकाने सांगितले. त्याच्या पडताळणीसाठी जमीनमालकाला स्थळनिरीक्षणासाठी बोलावण्यात आले. वयोवृद्ध व आजारपणामुळे जमीनमालकाने ‘एसीबी’कडे तक्रार केलेल्या व्यक्तीला कायदेशीररीत्या कारवाईकामी अधिकारपत्र देत स्थळनिरीक्षणासाठी पाठविले. त्या वेळी बहिरमने तक्रारदाराकडे पंधरा लाखांची मागणी करून पडताळणी पंचनाम्यानंतर लाच घेतली.
तपासात काय?
घरात १५ लाख रोख
१५ तोळे चांदी आणि ४० तोळे सोने
बँकेत पत्नीच्या नावे ३.५० लाखांची मुदतठेव
धुळ्यात ४ गुंठे प्लॉट (तत्कालीन किंमत २२ लाख)
विविध कार्यालयातील कामकाजावरून तक्रारी प्राप्त