नांदगाव तालुक्यातील बाणगाव टाकळी येथील शेतकरी सागर पवार हे पहाटेच्या सुमारास त्यांच्या शेतातील विहिरीवर मोटार चालू करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता त्यांना विहिरीत साप वळवळताना दिसला. त्यानंतर त्यांनी नांदगाव येथील सर्पमित्र विजय बडोदे यांना फोन केला. बडोदे यांनी प्रयत्न करत सापाला बाहेर काढले असता तो कोब्रा जातीचा असल्याचं लक्षात आले. यावेळी कोब्राने आपल्याच प्रजातीच्या कोब्राला पोटातून बाहेर काढले. कोब्राने भक्ष्यासाठी आपल्याच प्रजातीच्या सापाला भक्ष्य केल्याची घटना दुर्मिळ असल्याचे सर्प मित्र विजय बदोडे यांनी सांगितले.
विहिरीत असलेल्या सापाची माहिती मिळाल्यानंतर बडोदे यांनी विहिरीत बघितलं असता, साडेपाच फूट लांबीचा कोब्रा जातीचा विषारी साप पडलेला होता. त्याला बाहेर काढलं आणि पकडत असताना कोब्रा सापाने आपल्याच प्रजातीच्या कोब्रा सापाला पोटातून बाहेर काढलं. विहिरीतील सापाला बाहेर काढल्यानंतर त्याने पोटातून बाहेर काढलेला दुसरा कोब्रा मात्र मृत झाला होता. तर पकडलेल्या कोब्रा सापाला बडोदे यांनी बंदिस्त करत वन विभागाला माहिती दिली. त्याला पुन्हा निसर्गाच्या सानिध्यात जंगलात सोडण्यात आले.
दरम्यान कोब्रा जातीच्या सापानेच कोब्रा जातीच्या सापाला गिळल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अशा पद्धतीच्या अनेक घटना या सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ज्या पाहिल्यावर डोळ्यांना देखील विश्वास बसत नाही अशीच डोळ्यांना विश्वास न बसणारी घटना नांदगाव मध्ये घडली आहे. आपल्याच प्रजातीच्या सापाला भक्ष्य केल्याचे पाहायला मिळणे हे दुर्मिळच आहे.