सूरत/चेन्नई: हिऱ्यांचं शहर असलेल्या सूरतमध्ये सावजीभाई ढोलकिया नाव सुपरिचित आहे. दिवाळी बोनस म्हणून आपल्या कर्मचाऱ्यांना कार, फ्लॅट, ज्वेलरी देणारे ढोलकिया कायम चर्चेत असतात. आता ते चर्चेत आलेत त्यांच्या नातवानं केलेल्या मजुरीमुळे. सावजीभाईंची संपत्ती साडे बारा हजार कोटी रुपयांच्या घरात आहे. मात्र त्यांनी आपल्या अमेरिका रिटर्न नातवाला नोकरी आणि व्यवसायाचे धडे देण्यासाठी, त्याला आयुष्यातील खरीखुरी शिकवण मिळावी म्हणून चेन्नईला पाठवलं. अमेरिकेतून एमबीए करुन आलेला त्यांचा नातू महिनाभर चेन्नईत राहिला. संघर्ष आणि कष्टाची जाणीव व्हावी यासाठी सावजीभाईंनी त्याची रवानगी चेन्नईला केली होती.आजोबांच्या सूचनेनंतर रुविननं ३० जूनला चेन्नईला जाण्यासाठी रवाना झाला. त्याला स्वत:ची ओळख गुप्त ठेवण्यास सांगण्यात आलं होतं. मोबाईलचा वापर करण्याचीही परवानगी नव्हती. आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यासाठी केवळ ६ हजार रुपये देण्यात आले होते. चेन्नईत पोहोचल्यानंतर रुविननं काम शोधण्यास सुरुवात केली. परिस्थिती आव्हानात्मक होती. त्याला अनेक ठिकाणी नकार ऐकावा लागला. त्याला पहिली नोकरी गारमेंटच्या दुकानात सेल्समन म्हणून मिळाली. चेन्नई हायकोर्ट मेट्रोच्या जवळ असलेल्या दुकानात तो काम करायचा. नऊ दिवस त्यानं काम करुन त्यानं विक्री कौशल्य आत्मसात केलं.कोट्यवधींच्या कंपनीच्या मालकाचा वारसदार असेलला रुविन ८ दिवस एका भोजनालयात काम करत होता. वेटर म्हणून काम करताना त्यानं प्लेट सेटिंग आणि जेवण वाढण्याची कला आत्मसात केली. यानंतर ९ दिवस तो घड्याळ्याच्या दुकानात सेल्समन म्हणून कार्यरत होता. घड्याळ्यांच्या दुरुस्ती कामातही त्यानं मदत केली. रुविनची शेवटची नोकरी बॅगांच्या दुकानात होती. तिथे त्यानं २ दिवस मजूर म्हणून काम केलं.चेन्नईतील ३० दिवसांच्या वास्तव्यात त्यानं चार वेगवेगळ्या नोकऱ्या केल्या. ८० पेक्षा अधिक ठिकाणी त्यानं नकार ऐकला. चेन्नईत तो एका साध्या वसतिगृहात राहत होता. महिनाभरातील बरेचसे दिवस तो एकवेळ जेवला. ‘नवा दिवस नवी आव्हानं घेऊन यायचा. मात्र मी त्याकडे संधी म्हणून पाहायचो. अनेक ठिकाणी मला नकार ऐकावा लागला. त्यामुळे त्याचं दु:ख काय असतं ते मला समजलं. हॉटेलात वेटरची नोकरी करत असताना मला एकदा २७ रुपयांची टिप मिळाली. तो क्षण माझ्यासाठी खास होता. ते २७ रुपये माझ्यासाठी कोट्यवधींसारखे होते,’ अशी भावना त्यानं बोलून दाखवली. ‘नोकरी सोडत असताना हॉटेल मालकानं मला ६ तास ताटकळत उभं ठेवलं. त्यानंतर माझ्यासमोर २ हजार रुपये फेकले. कष्टकऱ्यांसोबत कसं वागू नये याचा धडा मी त्यावेळी घेतला,’ असं रुविननं सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here