मित्रांसोबत पिकनिकला गेलेल्या १६ वर्षाच्या मुलाचा वारी हनुमान रांजण्या डोहात बुडून मृत्यू झाला आहे. या प्रकरणी सोनाळा पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मुलाच्या मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली आहे. अकोला आणि बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवर सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वारी हनुमान हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. येथे पाण्याचे डोह आहेत.
शनिवार आणि रविवारी येथे अनेक पर्यटक पिकनिकसाठी आणि डोहात अंघोळीचा आनंद लुटण्यासाठी येतात. तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथील अनिकेत देखील रविवारी सुट्टी असल्याने मित्रांसोबत वारी हनुमान येथे पिकनिकला गेला होता. रांजण्या डोहात सर्व मित्र पोहण्यासाठी उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने अनिकेत पाण्यात बुडाला. रात्री उशिरापर्यंत मुलाला शोधण्यासाठी मोहीम राबवण्यात आली. तब्बल १८ तासांनंतर सकाळी मुलाचा मतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. या प्रकरणी सोनाळा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मुलाच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
एकीकडे जिल्ह्यांमध्ये मुख्यतः घाटाखालच्या भागांमध्ये मागील काही दिवसांपूर्वी ढगफुटी सदृश्य पावसाचा तडाखा बसला होता .त्यानंतर मुख्यतः ग्रामीण भागातील नदी ,नाले तुडुंब आणि क्षमतेपेक्षा जास्त भरलेले आढळून येतात. त्याच नदी आणि डोहामध्ये तरुणाई मनमुराद आनंद लुटताना दिसतात आणि त्यात अशा प्रकारचे अनर्थ घडतात. त्यामुळे निसर्गाचा आनंद लुटत असताना सावधानताही बाळगणं आवश्यक आहे.