कर्नाटक हे देशात टोमॅटो उत्पादकांपैकी सर्वात मोठे राज्य आहे. कोलार आणि चामराजनगर सारखे भाग टोमॅटो पिकांसाठी ओळखले जातात. टीव्ही९ कन्नडशी बोलताना, कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी राजेश म्हणाले की, या हंगामात टोमॅटोची विक्री करुन त्यांनी एक एसयूव्ही कार विकत घेतली.
“मी माझ्या १२ एकर शेतात टोमॅटोचे पीक घेतले आहे. मी जवळपास ८०० पोती टोमॅटो विकले आणि ४० लाख रुपये कमावले. टोमॅटोची किंमत काही महिने अशीच राहिल्यास मला कदाचित एक कोटी रुपयांचा नफाही होईल. माझा माझ्या भूमीवर विश्वास होता आणि त्यामुळे मी निराश झालो नाही. टोमॅटो विकल्यानंतर एसयूव्ही खरेदी करण्यात मला मदत झाली.” असं राजेश म्हणाले.
कर्नाटक राज्य हे देशातील सर्वात मोठ्या टोमॅटो उत्पादकांपैकी एक मानले जाते. कोलार आणि चामराजनगर सारखे पट्टे प्रामुख्याने टोमॅटो पिकांसाठी ओळखले जातात. अलिकडेच कोलार येथील एका शेतकरी कुटुंबाने टोमॅटोच्या 2,000 पेट्या विकून ३८ लाखांची कमाई केल्यानं चर्चा झाली होती.
बंगळुरुमध्ये टोमॅटोचे दर १०० ते १२० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले आहेत. मार्च आणि एप्रिलमध्ये तापमानात अचानक वाढ झाल्याने टोमॅटो पिकांवर कीटकांचा प्रादुर्भाव झाला, ज्यामुळे उत्पादनात घट झाली आणि बाजारभाव वाढले. टोमॅटोच्या वाढत्या मागणीनंतर आता कर्नाटकातही चोरीच्या घटनाही समोर येत आहेत.