याच राज्यात भारतातील सर्वात भयंकर किल्ला आहे, ज्याला भानगडचा किल्ला म्हणतात. पण, फक्त भानगडच नाही तर इथे एक भुताचं गावही आहे, जिथे लोक रात्रीच नाही तर दिवसाही जायला घाबरतात. या गावाची कहाणी खूपच भयंकर आणि घाबरवणारी आहे. या गावाचे नाव कुलधरा आहे.
जैसलमेरच्या पश्चिमेला सुमारे १७ किलोमीटर अंतरावर एक खंडर आहे. येथे तुटलेली घरे आणि भिंती दिसतात. पण, माणसं दिसत नाहीत. शेकडो वर्षांपूर्वी या ठिकाणी कुलधरा नावाचे समृद्ध गाव होते. मात्र आता ते खंडर झाले आहे. असं मानलं जातं की इथले लोक हे रातोरात गाव सोडून गेले, जणू ते एका रात्रीत गायब झाले. त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं की त्यांना घर सोडून जावं लागलं.
ही कहाणी ३०० वर्षांहून अधिक जुनी आहे. त्या काळात या गावात पालीवाल ब्राह्मण राहत होते. असे मानले जाते की त्या काळात या ठिकाणी सलीम सिंहचे राज्य होते, ज्यांची वाईट नजर या गावातील प्रमुखाच्या मुलीवर पडली, जी अतिशय सुंदर होती. त्याला त्या मुलीशी जबरदस्तीने लग्न करायचे होते. त्याने गावकऱ्यांना स्पष्टपणे सांगितले होते की, त्या मुलीला वाचवण्यासाठी कोणी मध्ये आलं किंवा तिला लपवण्याचा प्रयत्न केला तर त्याला ठार मारले जाईल.
या भीतीपोटी ते गाव आणि आजूबाजूच्या ८५ गावांनी बैठक बोलावली आणि ते सर्व एका रात्रीतून अचानक निघून गेले. गाव खाली करुन निघायचं होतं, त्यामुळे साहजिकच सगळेजण आपापलं सर्व सामान घेऊन इथून निघून गेले असावेत. पण, असं न होता सगळे आपालं सामान, रोजच्या वस्तू, अगदी खाण्यापिण्याचं सगळं सामान तिथेच टाकून घाईघाईने गाव सोडून निघून गेले.
गाव सोडताना त्यांनी या ठिकाणाला शाप दिला की या गावात पुन्हा कधीच गाव वसणार नाही आणि इतर कोणीही तेथे राहू शकणार नाही. त्यानंतर आजपर्यंत या गावात कोणीही राहू शकलेलं नाही. अनेक दशकांपासून ते तसेच पडीक आहे. दिवसा किंवा रात्री येथे जाताना एक विचित्र अस्वस्थता आणि भीती वाटत असल्याचा दावा लोकांनी केला आहे. काही लोकांचा असाही विश्वास आहे की सलीम सिंहने या गावावर इतका कर लादला होता की लोक तो भरू शकले नाहीत आणि दुसऱ्या ठिकाणी निघून गेले. आता या गावाची देखभाल पुरातत्व सर्वेक्षण आणि सरकारकडून केली जाते.