नवी दिल्ली : मणिपूरमधील हिंसाचाराच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी लोकसभेत अविश्वास प्रस्तावर मांडला आणि त्यावर आता सभागृहात चर्चा सुरू आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. मंत्री आणि सभागृहातील सत्ताधारी पक्षाची भाषा पाहता हे सरकार अत्यंत अहंकारी आहे, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी केंद्रातील एनडीए सरकारवर निशाणा साधला.
Manmohan Singh: प्रकृती साथ देईना पण पक्षाची गरज ओळखली; नव्वदीतील डॉ. मनमोहन सिंग व्हीलचेअरवर बसून सभागृहात
वास्तविकता आणि विद्यामान परिस्थितीला धरून कुठलाही सत्ताधारी नेता बोलत नाही. पुढेही आमचंच सरकार येणार आहे. विरोधक संपणार आहेत, अशी सातत्याने टीका सत्ताधारी पक्षाकडून होत असते. विरोधक तर उरलेच नाही. ही लोकशाही आहे का? आपण एकमेकांना सहकार्य करून पुढे गेलं पाहिजे. पण विरोधकांना सभागृह चालू द्यायचं नाहीए, अशी टीका मंत्र्यांकडून केली जात आहे. एका शब्दात म्हटलं तर हे सरकार अहंकारी आहे, असा घणाघात सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर केला.

मणिपूर, महागाई ते वंदे भारत एक्सप्रेस, संसदेत बोलताना सुप्रिया सुळेंकडून भाजपवर हल्लाबोल!

केंद्र सरकार सत्तेतील ९ वर्षांच्या कार्यकाळ साजरा करत आहे. आपली कामगिरी दाखवण्यासाठी केंद्र सरकारकडून देशात ( नवरत्न नौ साल ) मोहीमही राबवण्यात येत आहे. पण गेल्या ९ वर्षांत या सरकारने काय केलं ते पाहा. अनेक राज्यांमधील सरकारं भाजपने पाडली. गेल्या ९ वर्षांत ९ राज्य सरकारं भाजपने पाडली. ही लोकशाही आहे का? असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. महाराष्ट्रातील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं महाविकास आघाडी सरकार भाजपने पाडलं. शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटली. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी हा घणाघात केल्याचं बोललं जातंय.

केंद्र सरकारने अनेक स्वायत्त आणि महत्त्वाच्या संस्थांमध्ये हस्तक्षेप केला आहे. जनतेला खोटी आश्वासनं (जुमले पे जुमला) दिली जात आहेत. देशाची औद्योगिक आणि आर्थिक स्थितीही वाईट आहे. एवढच काय तर अनेक राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे. मणिपूर, हरयाणा, जम्मू-काश्मीर आणि महाराष्ट्रातही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्र सरकारवरही टीका केली आहे.

९ वर्षांत ९ राज्य सरकारे भाजपने पाडली. अरुणाचल, उत्तराखंड, मणिपूर, मेघालय, कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश, पुद्दुचेरी आणि महाराष्ट्रात तर दोन वेळा भाजपने सरकार पाडले, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी सत्ताधारी भाजपच्या ‘मिशन लोटस’ची भर सभागृहात चिरफाड केली. भाजपा जेव्हा सरकारमध्ये नव्हती तेव्हा त्यांचे नेते ‘पार्टी विथ द डिफरन्स’ असं म्हणत होते. पण कुठे आहे तुमची ही ‘पार्टी विथ द डिफरन्स’? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here