अहमदनगर: शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढलेली आहे. मात्र गुन्हेगारी आळा घालण्यासाठी काही पावलं उचलली जात आहेत. पोलीस दलाबद्दलची ही सकारात्मक बातमी आहे. कारण एका भाजी विक्रेता महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्याने हिसकावून नेलं होते. मात्र त्या भाजी विक्रेत्या महिलेला पोलिसांनी तीच मंगळसूत्र पुन्हा मिळवून दिलं आहे. त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला.मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले होते. या गुन्ह्याचा छडा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी लावला. पोलिसांनी सव्वा लाखांचे दागिने महिलेला परत मिळवून दिले आहे. पोलिसांनी दागिने परत मिळवून दिल्याबद्दल भाजीविक्रेत्या महिलेने पोलीस अधीक्षक राकेश ओला आणि स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख दिनेश आहेर यांच्या टीमचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. सावेडी उपनगरातील कजबे वस्ती येथील चंद्रभागा नारायण कजबे यांचा भाजीविक्रीचा व्यवसाय आहे. भाजी विकत असताना चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्याचे सोन्याचे दागिने हिसकावून नेले होते. माहिती मिळताच पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन पाहणी केली होती. त्यांनी निरीक्षक आहेर यांना तपासाच्या सूचना केल्या होत्या. हा गुन्हा सलीम शेख (रा. राहुरी) आणि त्याच्या साथीदाराने केला होता. तो छत्रपती संभाजीनगर रोडवरील जेऊर येथे येणार असल्याची माहिती आहेर यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी जेऊर येथे सापळा लावून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सोन्याचे मंगळसूत्र मिळून आले. न्यायालयाच्या आदेशानुसार ते मंगळसूत्र ओळख पटवून चंद्रभागा कजबे यांना देण्यात आले. त्याबद्दल आनंद व्यक्त करत त्यांनी पोलीस दलाचे आभार मानले.
Home Maharashtra कौतुकास्पद! …अन् म्हणून भाजी विक्रेत्या महिलेने केला पोलिसांचा सन्मान; वाचा नेमकं प्रकरण