सातारा : औंध येथे सातारा ते कान्हरवाडी ही एसटी बस वेळेत न आल्याने शाळकरी मुली आणि मुलांनी भर पावसात सोमवारी रात्री ८ आठ वाजल्यापासून सुमारे तीन तास औंध बसस्थानकात ठिय्या आंदोलन करून घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
कर्मचाऱ्याचा कामादरम्यान मृत्यू, नामांकित कंपनीवर हलगर्जीपणाचा आरोप, परिसरात तणाव
टेम्पो नको, सहानुभूती नको, आम्हाला वेळेत एसटी बस मिळालीच पाहिजे, आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, अशा घोषणा देऊन एसटी प्रशासनासह शासकीय यंत्रणा हलवून सोडली. विद्यार्थ्यांचे रौद्ररूप पाहून औंध बसस्थानकात शेकडो ग्रामस्थ आणि तरुणांनी गर्दी केली होती. यावेळी कोरेगाव आगार व एसटी महामंडळाच्या मनमानी कारभाराबद्दल औंध ग्रामस्थ, विद्यार्थी, पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
माकडाने दरीत फेकलेल्या पर्समध्ये होते ३५ हजार, जीव धोक्यात घालून ‘ते’ २०० फूट उतरले, अन्…
माध्यमिक आणि महाविद्यालयाचे शिक्षण घेण्यासाठी कळंबी, वडी, त्रिमली, नांदोशी तसेच पुसेसावळी भागातून शेकडो विद्यार्थी औंध येथे येतात. सोमवारी शाळा सुटल्यानंतर कळंबी, वडी, त्रिमली, नांदोशीचे विद्यार्थी सायंकाळी ४.३० पासून सातारा – कान्हरवाडी एसटी बसची वाट पाहात औंध बसस्थानकात बसले होते. मात्र, सहा वाजले तरी एसटी बस न आल्याने या मार्गावरील शाळकरी मुलांनी औंध बसस्थानक परिसरात एसटी बस प्रवेश करणाऱ्या मार्गावर भर पावसात आंदोलन सुरू केले.

एसटी बस येत नाही म्हटल्यावर यावेळी शाळा प्रशासनाने खासगी टेम्पोची व्यवस्था केली. मात्र, किती दिवस एसटीचा मनमानी कारभार सहन करायचा, अशी संतप्त प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आणि वेळेत एसटी बस सोडल्याशिवाय याठिकाणावरून हटणार नाही, अशी भूमिका घेतल्याने रात्री ९ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले नाही. यावेळी सातारा-कान्हरवाडी ही उशिरा आलेली एसटी बसही विद्यार्थ्यांनी रोखून धरली होती.

सेवानिवृत्त जवानाचे साताऱ्यात जंगी स्वागत, शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण, गावकऱ्यांकडून मिरवणूक!

दरम्यान, रात्री उशिरा सातारा विभाग नियंत्रक, कोरेगाव आगार वडूज आगाराच्या अधिकाऱ्यांनी ठोस आश्वासन दिल्यानंतर तसेच औंधचे उपसरपंच दिपक नलवडे, सहसचिव प्रा. संजय निकम, प्राचार्य एस. बी. घाडगे, उपप्राचार्य प्रा. प्रदिप गोडसे, भरतबुवा यादव, संतोष जाधव ग्रामस्थ, शिक्षकांनी मध्यस्थी केल्यानंतर विद्यार्थी एसटीमधून कळंबी गावी जाण्यास तयार झाले.

औंध शिक्षण शाखांमध्ये सुमारे तीन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यातील बरेचसे विद्यार्थी परगावहून एसटी बसने येतात. विद्यार्थ्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन एसटी महामंडळाने वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी. यासाठी औंध येथे सोमवारी रात्री आलेली एसटी बस अडवून विद्यार्थ्यांनी आंदोलन केले.

एसटी महामंडळाच्या गलथान कारभाराचा फटका वेळोवेळी आम्हा विद्यार्थ्यांना बसत आहे. त्यामुळे भर पावसात ठिय्या आंदोलन करण्याची वेळ आली. यापुढे तरी होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी वेळेत एसटी बस सोडाव्यात, अन्यथा यापेक्षा वेगळे आंदोलन छेडू. वारंवार होणाऱ्या दिरंगाईमुळे पालक चिंतेत असतात. तसेच मोठ्या प्रमाणात अभ्यासाचे नुकसान होते. नियमित सव्वापाच वाजता एसटी बस सोडावी.

– करुणा सगरे, विद्यार्थिनी इयत्ता नववी

औंध हे शिक्षणाचे माहेरघर आहे. मात्र, एसटी बस वेळेत येत नसल्याने विद्यार्थ्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. तरी सकाळी आणि संध्याकाळी नियमित एसटी बसच्या फेऱ्या सोडाव्यात.

– संपत काळे, पालक, कळंबी (ता. खटाव)

औंध शिक्षण मंडळाच्या विविध विद्या शाखांमध्ये सुमारे तीन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यातील बरेचसे विद्यार्थी परगावाहून एसटी बसने येतात. विद्यार्थ्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन एसटी महामंडळाने वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी. याबाबत एसटी महामंडळाच्या सर्व विभागांशी पत्रव्यवहार केला आहे.

– प्रा. संजय निकम, सहसचिव औंध शिक्षण मंडळ, औंध

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here