मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या सर्वच तलाव क्षेत्रात जुलै २०२३ मध्ये चांगली पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे जलसाठ्यामध्ये समाधानकारक वाढ झाली आहे. हीच परिस्थिती ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२३ मध्ये कायम राहील, असा अंदाज आहे. हे लक्षात घेता मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यात लागू केलेली १० टक्के पाणी कपात ९ ऑगस्ट २०२३ पासून रद्द करण्यात येत आहे, अशी घोषणा महापालिकेकडून करण्यात आली आहे.
महापालिकेनं दिलेल्या माहितीनुसार जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळं ९ ऑगस्टपर्यंत मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या धरणांमध्ये ८१ टक्केंच्या जवळपास पाणी साठा पोहोचला आहे. त्यामुळं १ जुलै २०२३ पासून लागू करण्यात आलेली पाणी कपात रद्द करण्यात आली आहे.
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये ८१. ४४ टक्के पाणीसाठा आहे. अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या धरणातून मुंबईला पाणीपुरवठा केला जातो.
पाऊस आणखी दीड महिना असणार असल्याने तलावांमध्ये पुरेसा जलसाठा होऊ शकतो. त्यामुळे मुंबई महापालिकेकडून सध्या सुरू असलेली १० टक्के पाणीकपात मागे घेण्याचा प्रस्ताव पालिका आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. त्याला पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी मंजुरी दिली. अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सातही तलावांची पाणीसाठवण क्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर आहे. या तलावांतून दररोज तीन हजार ८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो.