म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : कर्णकर्कश, विनाकारण हॉर्न वाजविणे यामुळे ध्वनिप्रदूषण प्रचंड वाढते. वाहनांच्या सायलेन्सरमध्ये बदल करणे, कर्णकर्कश हॉर्न बसविण्याचे प्रकार घडतात. या प्रकारांना आळा बसवण्यासाठी मुंबई पोलिसांच्या वतीने एक आठवडाभर विशेष मोहीम हाती घेण्यात येणार आहे. ९ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट यादरम्यान ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी म्हटले आहे.
मुंबईत ध्वनिप्रदूषण दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांकडे अनेक तक्रारी येत आहेत. लहान मुले आणि वृद्धांना यामुळे जास्त त्रास सहन करावा लागत आहे. विनाकारण हॉर्न वाजविणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यास आता मुंबई पोलिसांनी सुरुवात केली आहे. मात्र, त्याचा फारसा परिणाम जाणवत नसल्याने पोलिसांनी पूर्ण शहरामध्ये जनजागृती मोहीम हाती घेण्याचे ठरविले आहे. आज, बुधवारपासून १६ ऑगस्टपर्यंत ‘नो हॉकिंग डे’ मोहीम राबविण्यात येणार आहे.

या कालावधीत जनजागृतीबरोबरच कारवाई करण्यात येणार असल्याने चालकांनी त्यांच्या मोटार वाहनांचे हॉर्न आणि सायलेन्सर हे केंद्रीय मोटर वाहन नियम १९८९ च्या नियम क्रमांक ११९ आणि १२० मध्ये दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे असल्याबाबत खात्री करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
दरम्यान, गरज नसताना हॉर्न वाजविणाऱ्या वाहनचालकांवर मोटार वाहन कायदा कलम १९४ (एफ) प्रमाणे कारवाई करण्यात येईल. तसेच, जे वाहनचालक दुचाकी किंवा चारचाकी वाहनांच्या सायलेन्सरमध्ये बदल करून कर्कश आवाजात वाहने चालवतील, त्या चालकांवरही कलम १९८ मोटार वाहन कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात येणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी म्हटले आहे.