- थेट जलवाहिनीस मुहूर्त
नाशिक शहराला सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी गंगापूर धरण ते बाराबंगला जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत १२.५० किलोमीटर लांबीच्या थेट जलवाहिनीला अखेर मुहूर्त सापडला आहे. त्यामुळे नाशिकचा सन २०५५ पर्यंतचा पाणीप्रश्न मिटणार आहे.नवीन १८०० मिलिमीटर व्यासाची थेट जलवाहिनी टाकण्यासाठी तब्बल २०५ कोटींचा खर्च येणार असून, योजनेसाठी आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी चारसदस्यीय निविदा समिती स्थापन केली आहे. अधीक्षक अभियंता उदय धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समितीकडून पुढील आठवड्यात निविदा जाहीर केली जाणार आहे. शहराला ८० टक्के पाणीपुरवठा हा गंगापूर धरणातून केला जातो. त्यासाठी गंगापूर धरणातून पंपिंग स्टेशनद्वारे बाराबंगला जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत सन १९९७ ते २००० दरम्यान १२०० मिलिमीटर व्यासाच्या दोन सिमेंटच्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या होत्या. सन २०२१ पर्यंतच्या अंदाजित लोकसंख्येला पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने या थेट जलवाहिनीची रचना करण्यात आली होती. अस्तित्वातील २३ वर्षे जुन्या सिमेंटच्या जलवाहिनीला वारंवार लागणाऱ्या गळतीमुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. जलवाहिनीस गळतीची समस्या वारंवार उद्भवत आहे. दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद करावा लागत असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे गंगापूर धरण ते बाराबंगला जलशुद्धीकरण केंद्रादरम्यान ४२५ एमएलडी क्षमतेची १२.५० किलोमीटर लांबीची १८०० मिलिमीटर व्यासाची नवी लोखंडी जलवाहिनी टाकण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी केंद्राच्या पंधराव्या वित्त आयोगाचा निधीदेखील मंजूर झाला आहे. या प्रकल्पासाठी २०४ कोटी ३८ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. यासंदर्भातील प्रस्तावाला महासभेने मंजुरी दिल्यानंतर सल्लागार नेमून सविस्तर प्रकल्प अहवाल तांत्रिक छाननीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला सादर करण्यात आला होता. या प्रस्तावात आवश्यक त्या दुरुस्त्या सुचवून प्राधिकरणाने तांत्रिक मान्यता दिली आहे. त्यामुळे आयुक्तांनी निविदा समिती स्थापन करीत या कामाच्या निविदा जारी करण्याची तयारी केली आहे.निविदा पुढील आठवड्यातया चारसदस्यीय निविदा समितीचे अध्यक्ष अधीक्षक अभियंता उदय धर्माधिकारी यांच्याकडे असणार आहे. त्यांच्यासोबत यासमितीत मुख्य लेखा व वित्त अधिकारी नरेंद्र महाजन, प्रभारी मुख्य लेखापरक्षक प्रतिभा मोरे या समितीचे सदस्य, तर पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रवींद्र धारणकर हे निविदा समितीचे सदस्य सचिव आहेत. ही समिती पुढील आठवड्यात यासाठीची निविदा काढणार आहे. त्यामुळे नाशिकच्या २०५५ पर्यंतच्या लोकसंख्येचा पाणीप्रश्न निकाली निघणार आहे.
- विवाहेच्छुक तरुणांना फसविणारी टोळी जेरबंद
विवाह इच्छुक तरुणांना वधू दाखवून पैशांची मागणी करीत फसवणाऱ्या टोळीला येवला तालुका पोलिसांनी जेरबंद केले. योगेश पोपट जठार, अंजना योगेश जठार, सचिन प्रकाश निघुट, भाऊसाहेब मुळे (सर्व रा. सायगांव ता. येवला) तसेच शंकर जगन शेंडे (रा. गोंदेगाव ता. पारशिवनी जि. नागपूर) यांनी संगनमत करून दिलेश्वरी राणी (रा. भांडेवाडी ता. कामठी, जि. नागपूर) व सुजाता दिलीप निर्मलकर (रा. चिखली ता. कामठी) यांच्याशी विवाह करून देऊन त्यांच्याकडून रोख रक्कम व सोन्याचांदीचे दागिने असा एकूण ७ लाख ९३ हजार रुपये असा ऐवज घेतला. त्यानंतर काही दिवसांनी आईची तब्येत खराब आहे, असे सांगून संबंधित महिला अंगावरील दागिने घेऊन नागपूरला गेली. त्यानंतर दोन दिवसांनी सदर महिलेचे दुसरे लग्न झाल्याचे फोटो सोशल मीडियावर दिसल्यानंतर पतीने पोलिसांत तक्रार केली. यानंतर पोलिसांनी सापळा रचून, डमी नवरदेव तयार करून नागपूर जिल्ह्यातील कन्हान येथून संशयितांना पकडले.