दरम्यान, मूडीजच्या वृत्तामुळे मंगळवारी अमेरिकन शेअर बाजारात सुरुवातीच्या व्यवहारात मोठी घसरण पाहायला मिळाली. डाऊ जोन्स जवळपास ४५० अंकांनी घसरला तर S&P 500 आणि नॅसडॅक देखील एक टक्क्यांहून अधिक कोसळला.
अमेरिकेत बँकिंग संकटाचा कहर
२०२३ वर्षाच्या सुरूवातीला अमेरिकेतील मोजच्या पण बड्या बँकांना टाळं लागलं ज्यामुळे बँकिंग क्षेत्राला हादरा बसला. सिलिकॉन व्हॅली बँक, सिग्नेचर बँक आणि फर्स्ट रिपब्लिक या देशातील तीन मोठ्या बँका बुडाल्या. तर अमेरिकेची केंद्रीय बँक, फेडरल रिझर्व्ह वाढती महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी सातत्याने व्याजदर वाढवत आहे. सध्या देशातील व्याजदर २२ वर्षांच्या उच्चांकावर असून यामुळे अमेरिकन बँकांची अवस्था आणखी बिकट झाली आहे.
मुडीजने बँकांना दिलेल्या इशाऱ्यात म्हटले आहे की, अमेरिकन बँकांच्या स्थिर दराच्या रोख्यांचे मूल्य जास्त व्याजदरामुळे कमी झाले आहे, त्यामुळे तरलतेचा धोका निर्माण होऊ शकतो.
१० बँकांच्या रेटिंग कमी झाल्या
ट्रिस्ट (TFC), फ्रॉस्ट बँक आणि यूएस बॅन्कॉर्प (USB) बँका देखील मूडीजच्या पुनरावलोकन यादीत आहेत. करोना आजारामुळे लोक घरून काम करत असल्याने कार्यालयांचे मूल्य घसरत आहे. त्यामुळे बँकांचे मोठे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली. बँकांनी अनेक रिअल इस्टेट करारांना वित्तपुरवठा केला असून प्रादेशिक आणि सामुदायिक बँका विशेषत: त्यांच्याशी लक्षणीय संपर्क साधतात. बहुतेक प्रादेशिक बँकांचे नियामक भांडवल कमी असल्याचे मूडीजचे म्हणणे आहे. अमेरिकन बँकांच्या दुसऱ्या तिमाहीच्या निकालात व्याजदरात वाढ झाल्यामुळे त्यांच्या नफ्यावर दबाव वाढल्याचे समोर आले आहे.
मूडीजने दहा लहान यूएस बँकांचे रेटिंग देखील कमी केले ज्यात कॉमर्स बँकशेअर्स (CBSH), बीओके फायनान्शियल कॉर्पोरेशन आणि एम अँड टी बँक कॉर्पोरेशन यांचा समावेश असून या बँकांच्या मूल्यात घट होण्याची शक्यता असल्याचे एजन्सीचे म्हणणे आहे. छोट्या आणि मध्यम आकाराच्या बँका, विशेषतः, व्यावसायिक रिअल इस्टेटच्या संपर्कात आल्याने मोठे नुकसान होऊ शकते.