रत्नागिरी : निलिमा चव्हाण मृत्यू प्रकरणी कोणताही घातपात झाला नाही असा निष्कर्ष प्रथमदर्शनी समोर येत आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. मुंबई येथे तपासणीसाठी पाठवण्यात आलेला व्हिसेरा अहवाल आल्यानंतरच नीलिमाच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. मृतदेह तीन दिवस पाण्यात राहिल्याने केस शरीरापासून वेगळे होऊ शकतात, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी अहवालात दिले आहे.निलिमाचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला असून तिच्या शरीरावर मृत्यूपूर्व जखमा तसेच अंतर्गत जखमा आढळल्या नाहीत, असे त्यामध्ये म्हटले आहे. स्टेट बँकेच्या दापोली शाखेत नीलिमा चव्हाण ही कंत्राटी पद्धतीवर कार्यरत होती. दापोली येथून चिपळूण तालुक्यातील ओमळी या गावी निघाल्यानंतर ती बेपत्ता झाली होती. यानंतर तीन दिवसांनी तिचा मृतदेह दाभोळ खाडीत मिळाला होता. तिच्या डोक्यावर व भुवयांवर केस नसल्याने या प्रकरणाभोवती गूढ निर्माण झाले होते. नीलिमाचा मृत्यू घातपातामुळे झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला होता. परंतु तिचा मृतदेह तीन दिवस खाऱ्या पाण्यात राहिल्याने तो कुजण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. या स्थितीत केस जाण्याची शक्यता दाट असते, असे मत वैद्यकीय अहवालात व्यक्त करण्यात आले आहे. दरम्यान, आतापर्यंत निलिमा चव्हाणसोबत हॉस्टेलमध्ये राहणार्या मैत्रिणी, कॉलेजच्या मैत्रिणी, नोकरीच्या ठिकाणी असणारे तिचे वरिष्ठ व सहकारी, बँकेतील नोकरवर्ग, पूर्वी नोकरीच्या ठिकाणी असणारे व्यक्ती, प्रवासा दरम्यान भेटणारे एसटी कंडक्टर, शेवटी पाहणारे व CCTV फुटेजमध्ये दिसणारे स्थानिक मच्छीमार असे विविध १०४ साक्षीदारांकडे करण्यात आलेल्या चौकशीत तसेच भरणे नका, खेड येथील CCTV फुटेज व जगबुडी नदीवरील जुन्या पुलाच्या ठिकाणी वावर असलेल्या महत्वाच्या स्थानिक साक्षीदारांकडे करण्यात आलेल्या प्राथमिक पोलीस तपासात घातपाताचा पुरावा अद्याप समोर आलेला नाही.
Home Maharashtra निलिमा मृत्यू प्रकरण; पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, निलिमाचा मृत्यू घातापाताने नाही तर…