ईटाइम्सशी बोलताना नितीन कुलकर्णी म्हणाले की, ‘मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना भेटण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून स्टुडिओच्या संचालकांपैकी एक असणाऱ्या नितीन देसाई यांच्या पत्नी यांना या परिस्थितीतून मार्ग काढण्यास मदत होईल. शिवाय त्यांना कर्जदार कंपनीकडून यापुढे कोणत्याही छळाचा आणि दबावाचा सामना करावा लागणार नाही आणि स्टुडिओचे दायित्व सहन करावे लागणार नाही.’
कुलकर्णी यांनी पुढे म्हटले की, ‘ज्या दिवशी देसाई दिल्लीहून परतले आणि स्वत:चा जीव घेतला, त्या दिवशी त्यांनी स्टुडिओ वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न केला. देसाई यांच्यावर फायनान्स कंपनीने एवढा दबाव टाकला होता की त्यांना आता हा ताण सहन होत नव्हता असेही त्यांनी म्हटले.’
जवळच्या मित्राने अशाप्रकारे वाढदिवसाच्या काही दिवस आधी जीवन संपवले याविषयी बोलताना कुलकर्णी यांनी असे म्हटले की, ‘योगायोगाने, देसाई यांचा वाढदिवस ६ ऑगस्टला होता. त्यांची पत्नी आणि मुलीने असा आग्रह धरला होता की मुलगी अमेरिकेला जाण्यापूर्वी त्यांचा वाढदिवस साजरा करावा. पण देसाई यांनी त्यांना सांगितले की, यावर्षी ते त्यांचा वाढदिवस साजरा करणार नाहीत. कोणी स्पप्नातही विचार केला नव्हता की वाढदिवस साजरा न करणे म्हणजे असे काहीतरी भयानक असेल.’
दरम्यान देसाई यांची मुलगी मानसी हिने अलीकडेच दिलेल्या एका निवेदनात सांगितले होते की, तिच्या वडिलांनी एका कंपनीकडून १८१ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते आणि त्यापैकी ८६.३१ कोटी रुपयांचे कर्ज त्यांनी फेडले. कोणाचीही फसवणूक करण्याचा तिच्या वडिलांचा हेतू नसल्याचे मानसी म्हणाली. कर्ज कंपनीने त्याच्यावर कायदेशीर कारवाई करताना खोटे आश्वासन दिल्याचेही तिने सांगितले.