चंदिगढ: पत्नीनं मुलांच्या संगोपनावरुन टोमणा मारल्यानंतर पित्यानं लाडक्या लेकाची हत्या केली. लाडक्या मुलाला त्यानं कालव्यात बुडवून संपवलं. मुलाचं अपहरण झाल्याची बतावणी त्यानं केली. मात्र सीसीटीव्ही फुटेज आणि पोलिसांच्या प्रश्नांनी अखेर त्याचं बिंग फुटलं. पत्नीसोबत झालेल्या वादातून मुलाला संपवल्याची कबुली त्यानं पोलिसांना दिली. हरयाणाच्या रोहतकमध्ये घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मंगळवारी आरोपीला न्यायालयात हडर करण्यात आलं. न्यायाधीशांनी त्याला पोलीस कोठडी सुनावली.पेशानं दूध विक्रेता असलेल्या सुनीलनं ६ ऑगस्टला त्याचा मोठा मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. दिपांशु असं बेपत्ता मुलाचं नाव होतं. त्याचं वय ६ वर्षे ९ महिने होतं. ५ ऑगस्टला रात्री आठच्या सुमारास दिपांशु घरातून बेपत्ता झाल्याचं सुनीलनं तक्रारीत म्हटलं. दिपांशुची चप्पल कालव्याजवळच्या पुलावर सापडली. त्याचं कोणीतरी अपहरण केला असावं असा संशय सुनीलनं बोलून दाखवला. त्यानंतर पोलिसांनी अपहरणाची तक्रार नोंदवत तपास सुरू केला. पोलिसांना सुनीलच्या देहबोलीवर संशय आला. त्यांनी त्याची उलटतपासणी केली. पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं गुन्ह्याची कबुली देत संपूर्ण घटनाक्रम कथन केला. ‘आम्हाला दोन मुलं आहेत. मोठा दिपांशु आणि धाकटा मयंक. पत्नीचं मयंकवर जास्त प्रेम होतं. तर दिपांशु माझा लाडका होता. धाकट्याकडेही लक्ष देत जा, असं पत्नीनं मला सुनावलं. यावरुन आमच्यात वादही व्हायचे. त्यामुळे मी वादाचं मूळच संपवण्याचं ठरवलं. मी दिपांशुला घेऊन जवाहरलाल नेहरु कालव्याजवळ असलेल्या स्मशान घाटावर असलेल्या पुलावर नेलं. कालव्यात अंघोळ करुया म्हणून मी त्याला पाण्यात घेऊन गेलो. तिथेच मी त्याला बुडवून मारलं. त्यानंतर त्याचा मृतदेह खोल पाण्यात टाकला,’ अशी माहिती सुनीलनं दिली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला. तेव्हा त्यांना सुनील दुचाकीवरुन जाताना दिसला. त्याच्या मागे दिपांशु बसला होता. दुचाकीच्या दोन्ही बाजूंना दुधाचे कॅन होते. याच सीसीटीव्हीत काही वेळानं सुनील दुचाकीवरुन एकटा परत येताना दिसला. यावरुन पोलिसांना सुनीलबद्दल संशय आला. पोलिसांनी सुनीलला अटक केली असून सध्या त्याची चौकशी सुरू आहे. पोलीस या प्रकरणातील आणखी पुरावे गोळा करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here