भोपाळ: भविष्य निर्वाह निधीत जमा असलेली रक्कम काढण्यासाठी निवृत्त नर्सनं मुंडण केलं. सिव्हिल सर्जनच्या नावानं निवृत्त नर्सनं केस कापले. यानंतर महिला जिल्हा मुख्यालयातील आरोग्य विभागात पोहोचली. यानंतर एकच खळबळ उडाली आणि पीएफचे पैसे मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली. कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारातून एक ठराविक रक्कम भविष्य निधीसाठी काढण्यात येते. ही रक्कम पीएफ खात्यात जमा होते. निवृत्तीनंतर ही रक्कम कर्मचाऱ्याला दिली जाते.मध्य प्रदेशच्या शाजापूर जिल्हा मुख्यालयात नर्स म्हणून काम केलेल्या कृष्णा विश्वकर्मा पीएफ खात्यातील रक्कम काढण्यासाठी चार महिन्यांपासून सीएस कार्यालय आणि सिव्हिल सर्जन कार्यालयाच्या चकरा मारत आहेत. त्यांनी दोन्ही कार्यालयांमध्ये अर्ज दिले. मात्र काहीच उपयोग झाला नाही. या दिरंगाईविरोधात कृष्णा विश्वकर्मा यांनी टोकाचं पाऊल उचललं. त्यांनी मुंडण करुन जिल्हा मुख्यालय गाठलं.कृष्णा विश्वकर्मांनी आरोग्य विभागावर गंभीर आरोप केले आहेत. ‘दीदी, तुम्ही काही दिलंत तर आम्ही तुमचे पैसे ४ दिवसांत काढून देऊ, असं सिव्हिल सर्जन ऑफिसातील पाटीदार सर म्हणाले. त्यामुळेच सिव्हिल सर्जनच्या नावानं मी मुंडण करुन केस दान केले. काहीतरी द्या असं ते म्हणाले होते. आता मी केस दिले आहेत. आता तरी मला माझी रक्कम द्या,’ असं विश्वकर्मा म्हणाल्या.मुंडण करुन आलेल्या कृष्णा विश्वकर्मांना पाहून सगळ्यांचेच धाबे दणाणले. सिव्हिल सर्जन बी. एस. मीणा यांनी सारवासारव केली. ‘कृष्णा विश्वकर्मांना पीएफमधील पैसे काढायचे आहेत. त्यासाठी त्यांचा अर्ज आला आहे. मात्र त्यांचं पीएफ खातं मॅच होत नाहीए. त्यात बॅलन्स नसल्याचं दिसत आहे. या संदर्भात मी खजिनदाराला पत्र लिहिलं आहे. एक ते दोन दिवसांत त्यांचं खातं व्यवस्थित होईल. त्यात बॅलन्स दिसू लागेल. त्यानंतर पीएफचे पैसे काढता येतील,’ अशा शब्दांत मीणा यांनी सारवासारव केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here