कोलकाता: वादग्रस्त जमिनीवरुन हटवण्याचा आदेश उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जॉय सेनगुप्ता यांनी दिला. शिवलिंग हटवण्यासंदर्भात न्यायाधीशांनी दिलेला निकाल लिहिताना असिस्टंट रजिस्टार अचानक बेशुद्ध पडले. त्यांना न्यायालयातील आरोग्य केंद्रात नेण्यात आलं. असिस्टंट रजिस्टार यांची अवस्था पाहून न्यायमूर्ती जॉय सेनगुप्ता यांनी त्यांचा निकाल बदलला. न्यायालयात घडलेल्या नाट्यपूर्ण घडामोडी सध्या सर्वत्र चर्चेचा विषय झाल्या आहेत.मुर्शिदाबादच्या बेलडांगामधील खिदिरपूरमध्ये वास्तव्यास असलेल्या सुदीप पाल आणि गोविंद मंडल यांच्यामध्ये जमिनीच्या तुकड्यावरुन बऱ्याच काळापासून वाद आहे. गेल्या वर्षीच्या मे महिन्यात प्रकरण मारामारीपर्यंत गेलं. यानंतर गोविंद यांनी वादग्रस्त जमिनीवर रातोरात शिवलिंगाची प्रतिष्ठापना केली. सुदीप यांनी याची तक्रार पोलिसात केली. पोलिसांनी तपासाचं आश्वासन दिलं. पण पुढे कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे सुदीप यांनी कोलकाता उच्च न्यायालयात धाव घेतली.गोविंद यांनी जाणूनबुजून वादग्रस्त जमिनीवर शिवलिंगाची स्थापना केल्याचा युक्तिवाद सुदीप यांचे वकील तरुणज्योती तिवारी यांनी कोर्टात केला. पोलीस कोणतीच कारवाई करत नसल्यानं कोर्टानं हस्तक्षेप करावा, अशी मागणी त्यांनी केली. यावर गोविंदचे वकील मृत्यूंजय चटोपाध्याय यांनी प्रतिवाद केला. माझ्या अशिलानं शिवलिंगाची प्रतिष्ठापना केलेली नाही. ते शिवलिंग जमिनीतून प्रकट झालं आहे, असा प्रतियुक्तिवाद चट्टोपाध्याय यांच्याकडून करण्यात आला.दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायमूर्ती जॉय सेनगुप्ता यांनी शिवलिंग जमिनीवरुन हटवण्याचा आदेश दिला. न्यायाधीशांच्या निकालाची नोंद करताना असिस्टंट रजिस्ट्रार विश्वनाथ रॉय अचानक बेशुद्ध होऊन कोसळले. हा प्रकार पाहून न्यायमूर्तींनी त्यांचा निर्णय बदलला. हा खटला खालच्या कोर्टात सिव्हिल केसच्या माध्यमातून चालवला जावा, असं न्यायाधीश म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here