लखनऊ: वडिलांच्या निधनानंतर एक मुलगी त्यांच्या निवृत्ती वेतनावर मजा मारत होती. दहा वर्षांपूर्वीच तिच्या वडिलांचं निधन झालं होतं. मात्र त्यानंतरही ती वडिलांच्या नावे येणारी घ्यायची. या प्रकरणाचा तपास जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आला. आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे. तिला न्यायालयात हजर करुन तिची रवानगी तुरुंगात करण्यात आली. घटना उत्तर प्रदेशच्या एटामधील अलीगंज तहसीलच्या कुंचादायम खाँ मोहल्लातील आहे. इथे वास्तव्यास असलेले विजारत उल्ला खाँ ३० नोव्हेंबर १९८७ रोजी लेखापाल पदावरुन निवृत्त झाले. त्यानंतर काही वर्षांतच विजारत यांच्या पत्नी साविया यांचं निधन झालं. तर २ जानेवारी २०१३ रोजी विजारत निवर्तले. यामुळे विजारत यांना मिळणारी पेन्शन बंद होणार होती. निवृत्त झालेल्या सरकारी कर्मचाऱ्याला आणि त्याच्या निधनानंतर त्या व्यक्तीच्या जोडीदाराला पेन्शन मिळते, असा नियम आहे.विजारत यांच्या निधनानंतरही पेन्शन सुरू राहावी यासाठी त्यांची मुलगी मोहसिना परवेजनं पेन्शनच्या कागदपत्रांत फेरफार केले. आपण विजारत यांची पत्नी असल्याची कागदपत्रं तिनं तयार केली आणि विजारत यांना मिळणारी पेन्शन घेण्यास सुरुवात केली. १० वर्षांपेक्षा अधिक काळ मोहसिनानं पेन्शनचे पैसे लाटले. या कालावधीत कोणालाच तिच्यावर संशय आला नाही.उपजिल्हाधिकारी मानवेंद्र सिंह यांना मोहसिनावर संशय आला. त्यांनी चौकशीचे आदेश दिले. मोहसिनानं कागदपत्रांमध्ये फेरबदल करुन शासकीय पैसा लाटल्याचं तपासातून समोर आलं. त्यानंतर अलीगंज पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला. पोलिसांनी मोहसिना विरोधात आरोपपत्र दाखल केलं. यानंतर मोहसिना बराच काळ फरार होती. अखेर मंगळवारी तिला अटक झाली. तिला कोर्टात हजर करण्यात आली. न्यायाधीशांनी तिची रवानगी तुरुंगात केली. आरोपी महिलेनं गेल्या १० वर्षांत १२ लाख रुपये लाटले आहेत.