म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: प्रसूतीनंतर अवघ्या एक दिवसाच्या बाळाला एसटी स्टँडवर बेवारस सोडून देणाऱ्या आणि पोलिसांनी त्या बाळासह रुग्णालयात दाखल केल्यानंतरही बाळाची गळा दाबून हत्या करणाऱ्या निर्दयी महिलेची जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाने नुकतीच कायम केली. मात्र, जवळपास २७ वर्षांपूर्वीच्या या गुन्ह्याप्रकरणी दोषी ठरलेली ही महिला ११ वर्षांपासून फरार असून पोलिसांना आजतागायत तिचा थांगपत्ता लागलेला नाही. त्यामुळे जन्मठेपेच्या शिक्षेची अंमलबजावणी कशी होणार हा प्रश्नच आहे.

कमलाबाई तुकाराम घरत असे या गुन्हेगार महिलेचे नाव आहे. अलिबाग सत्र न्यायालयाने १९ नोव्हेंबर १९९४ रोजी दोषी ठरवून तिला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. त्याविरोधात तिने १९९५मध्ये अपील केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने ९ डिसेंबर १९९६ रोजी अपील सुनावणीसाठी दाखल करून घेत तिला जामीन मंजूर केला होता. त्यानंतर २ एप्रिल २००९ रोजी अपील सुनावणीसाठी आले असताना दोषी महिलेचा थांगपत्ता लागत नसल्याने तिला हजर करणे उरण पोलिसांना शक्य झाले नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाने तिच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले होते. त्यानंतरही अनेकदा निर्देश देऊनही पोलिसांना तिचा शोध लावण्यात यश आले नाही.

अखेरीस उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे विधी सहाय्य पॅनलवरील अॅड. किशोर वळंजू यांची कमलाबाईची बाजू मांडण्यासाठी नेमणूक करण्यात आली. त्यानंतर अपीलावर अंतिम सुनावणी घेऊन न्या. आर. डी. धनुका व न्या. सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठाने १२ मार्च रोजी राखून ठेवलेला निर्णय नुकताच जाहीर केला. ‘अपील फेटाळले असल्याने सत्र न्यायालयाने दोषी महिलेला हजर करण्याचा आदेश पोलिसांना द्यावा आणि दोषी महिला उर्वरित शिक्षा भोगेल याची खबरदारी घ्यावी’, असे निर्देशही खंडपीठाने निर्णयात दिले.

काय आहे प्रकरण?

जिल्ह्यातील उरण तालुक्यातील नवीन शेवा येथील रहिवासी असलेल्या या महिलेने एका मुलीला जन्म दिल्यानंतर तिला एसटी बसस्थानकाजवळ सोडून दिले. त्यानंतर बसस्थानकात गर्दी जमली असल्याचे पाहून अनंत घरत हे तिथे गेले आणि त्यांनी शरीरावर काही जखमा असलेल्या त्या बाळाला आपल्या घरी नेले. त्यानंतर त्यांच्या आई हिराबाई यांनी बाळाला अंघोळ घालून दूध दिले. दरम्यान पोलिसही अनंत यांच्या घरी आले. त्यावेळी ‘कमलाबाई गर्भवती असल्याचे पाहिले होते’, अशी माहिती हिराबाईंनी दिल्यानंतर पोलिसांनी कमलाबाईला ताब्यात घेतले. त्यानंतर आधी उरणमधील रुग्णालयात आणि नंतर अलिबाग सरकारी रुग्णालयात बाळ व कमलाबाईला दाखल केले. त्यावेळी जवळ कोणी नसल्याचे पाहून कमलाबाईने खाटेवरील बाळाचा गळा दाबून ठार केले.

‘आईच मारेकरी’

‘कमलाबाईनेच त्या बाळाला जन्म दिला आणि त्यानंतर एसटी स्टँडवर बेवारस सोडले. शिवाय नंतर तिनेच बाळाची गळा दाबून हत्या केली, हे सिद्ध करणारा कोणीही साक्षीदार नाही’, असा युक्तिवाद अॅड. वळंजू यांनी मांडला. तर ‘कमलाबाई गर्भवती होती, असे हिराबाईंनी साक्षीत सांगितले. खुद्द कमलाबाईनेही दोन-तीन दिवसांपूर्वी बाळाला जन्म दिल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिली होती. शिवाय कमलाबाई ही बाळासोबत रुग्णालयातील एका खाटेवर असताना परिचारिका कामानिमित्त दुसरीकडे गेल्यानंतर अन्य कोणीही तिथे नव्हते. त्यामुळे कमलाबाईनेच बाळाची गळा दाबून हत्या केल्याचे स्पष्ट होते. बाळाच्या जीवाला धोका नव्हता आणि त्याची प्रकृती स्थिर होती, असे डॉक्टरांच्या साक्षींमधूनही स्पष्ट झाले आहे. कमलाबाईला आधीच पाच मुले होती आणि हे अपत्य अनैतिक संबंधातून असल्याने समाजात बदनामी होईल या भीतीपोटीच तिने बाळाची हत्या केली’, असा युक्तिवाद सरकारी वकील मानकुंवर देशमुख यांनी मांडला. खंडपीठाने तो ग्राह्य धरला. ‘सरकारी पक्षाने सर्व परिस्थितीजन्य पुराव्यांची साखळी निर्विवादपणे सिद्ध केली असून कमलाबाईव्यतिरिक्त अन्य कोणीही बाळाचा मारेकरी असू शकत नाही’, असे निरीक्षण नोंदवून खंडपीठाने तिचे अपील फेटाळून लावले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here