म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

‘स्वत:ची जैविक मुलगी असूनही पुन्हा मूल दत्तक घेताना मुलगीच घेण्याचा या दाम्पत्याचा निर्णय प्रशंसनीय आहे. त्यांचा सकारात्मक विचार वाखाणण्याजोगा आहे. इतकेच नव्हे तर बहुतांश पितृसत्ताक समजल्या जाणाऱ्या आपल्या समाजात हा दृष्टिकोन व विचार रुजणे गरजेचे आहे’, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईतील घाटकोपरमधील एका दाम्पत्याची प्रशंसा केली.

स्वत:ची १४ वर्षांची मुलगी असूनही अनाथ मुलीला दत्तक घेण्याचा निर्धारपूर्वक निर्णय घाटकोपर, पंतनगरमधील ४३वर्षीय पती व ४०वर्षीय पत्नीने घेतला. त्या अनुषंगाने या मराठी दाम्पत्याने ‘सेंट कॅथरिन्स होम’शी संपर्क साधून कायदेशीर प्रक्रिया सुरू केली. एखादे मूल अनाथ असेल किंवा जैविक माता-पित्यांनी त्याग करून त्याला अनाथालयात दिले असेल तर इच्छुक दाम्पत्याला दत्तक देण्यासंदर्भात संबंधित संस्थेला उच्च न्यायालयात दत्तक याचिका करावी लागते. त्याप्रमाणे ही याचिका न्या. गिरीश कुलकर्णी यांच्यासमोर सुनावणीस आली होती.

‘मी या दाम्पत्याशी संवाद साधला आहे. विशेषत: त्यांना या निर्णयासाठी प्रेरणा मिळालेले पत्र पाहिले. एक मूल दत्तक घेण्याचा निर्धार त्यांनी पूर्वीपासूनच केलेला दिसत आहे. बाल आनंद आश्रमकडून मिळालेल्या बाल आनंद (उमंग) या पुस्तकानेही त्यांना प्रेरणा मिळाली. त्यांनी दरवर्षी आपल्या जैविक मुलीचा वाढदिवस व अन्य कार्यक्रमही आवर्जून अशा संस्थांमध्ये करण्याचा प्रघात घातला आहे. शिवाय मुलगी असूनही पुन्हा मुलगी दत्तक घेण्याचा त्यांचा निर्णय अधिक प्रशंसनीय आहे. त्यांचा हा दृष्टिकोन व विचार आपल्या पितृसत्ताक समाजातही रुजण्याची गरज आहे’, असे निरीक्षण न्यायमूर्तींनी आपल्या निर्णयात नोंदवले. दत्तक मुलीच्या नावे दीड लाख रुपयांचा एकरकमी एलआयसी विमा काढण्याचे निर्देशही न्यायमूर्तींनी त्यात या दाम्पत्याला दिले.

दुसऱ्या लेकीने सजणार घर

९ जून, २०१९ रोजी जन्मलेल्या या मुलीला तिच्या जैविक मातेने अंधेरीतील सेंट कॅथरिन्स होमकडे सोपवले होते. त्यानंतर संस्थेने तिला दत्तक देण्यास कायदेशीरदृष्ट्या मुक्त असल्याचे जाहीर केले. तिला दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या या दाम्पत्याची आर्थिक व सामाजिक स्थिती तपासल्यानंतर संस्थेने अंतिम निर्णय घेतला. त्यानंतर न्यायमूर्तींनीही सर्व बाजू तपासून या दाम्पत्याला परवानगी देत ते आता या अनाथ मुलीचे पालक असल्याचे आदेशाद्वारे जाहीर केले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here