नाशिक तालुक्यातील राजूर बहुला येथील मुरूम उत्खनन प्रकरणात संबंधित जमिन मालकाला सव्वा कोटींचा दंड ठोठावला होता. या आदेशाविरुद्ध जमीनमालकाने उपविभागीय अधिकार्यांकडे अपील दाखल केले. त्यांनी हे प्रकरण फेरचौकशीसाठी पुन्हा बहिरम यांच्याकडे पाठविले. उत्खनन केलेला मुरूम त्याच जागेत वापरल्याचा जमीनमालकाचा दावा असल्याने स्थळनिरीक्षण करण्यात आले. त्यावेळी बहिरम यांनी तक्रारदाराकडे तडजोडीअंती १५ लाखांची लाच मागितली होती.
शनिवारी पाच ऑगस्ट रोजी बहिराम यांना तब्बल १५ लाख रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात अटक केली होती. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला ६ ऑगस्ट रोजी सकाळी अटक करण्यात आली होती. त्यानंतर तो ४८ तास पोलीस कोठडीत असल्याने नियमानुसार त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकार्यांच्या पूर्व परवानगीशिवाय नरेश कुमार बहिरम यांनी मुख्यालय सोडू नये असे या आदेशात म्हटले आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बहिरम यांना लाच घेताना रंगेहात अटक केल्यानंतर त्याच्या घराची झडती घेण्यात आली होती. साडेचार लाखांच्या रोकडसह, ४० तोळे सोने व १५ तोळे चांदी जप्त केली होती. तसेच एसीबीच्या तपासात २०२२ मध्ये धुळे जिल्ह्यातील बोनगावात चार गुंठे प्लॉटची खरेदी केल्याचे तपासात समोर आले आहे. तर बहिरम यांच्या पत्नीच्या नावे ३ लाख ५० हजार रुपयांची बँकेत मुदत ठेव आहे.