पोलिसांच्या माहितीनुसार, मुलीचं वय १५ वर्षे आहे. मिर्झापूरच्या चुनार तालुक्यातील एका गावातील ती रहिवासी आहे. गावातील एका महिलेने तिला वाराणसीच्या रामनगरमध्ये ब्युटी पार्लरमध्ये नोकरी देण्याची बतावणी करून नेले होते. काही दिवस सगळं काही ठीक चाललं होतं. मात्र, त्यानंतर थोड्या दिवसांनी ब्युटी पार्लरमध्ये गुंगीचे औषध देऊन वेश्याव्यवसायात ढकलले. तिथे तिच्यावर दररोज बलात्कार केला जात होता. मुलीने त्यांच्या तावडीतून स्वतःची कशीबशी सुटका करून घेतली. त्यानंतर वाराणसी पोलिसांत जाऊन घडलेली घटना सांगितली.
वाराणसी पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. त्यांनी तात्काळ चुनार पोलिसांशी संपर्क साधला. मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली असल्याची माहिती त्यांनी वाराणसी पोलिसांना दिली. मुलीच्या काकाच्या मुलाने १५ ऑगस्ट रोजी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. मुलीने आरोपींविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना अटक करण्यासाठी ठिकठिकाणी छापेमारी केली जात आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times