अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्रात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी हजर नसल्यामुळे कारवाडी येथून प्रसुतीला आलेल्या रेणुका किरण गांगुर्डे या आदिवासी महिलेवर वेळेत उपचार न झाल्याने तिचा अतिरक्तस्रावामुळे मृत्यू झाला. या प्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. साहिल खोत यांच्यावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी बुधवारी सायंकाळी सेवा निलंबनाची कारवाई केली. यासह एक डॉक्टर आणि रूग्णवाहिकेचा चालक या दोघांवर सेवासमाप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कारवाडी येथील रहिवासी अशोक राणु वाघ यांची मुलगी रेणुका किरण गांगुर्डे ही द्वितीय प्रसुतीसाठी माहेरी आलेली होती. ३ ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजता रेणुका यांना प्रसुतीकळा चालू झाल्याने तिला चासनळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसुतीसाठी नेण्यात आले. त्या ठिकाणी नेमणुकीस असलेल्या परिचारिका यांनी डॉक्टर उपलब्ध नसल्याचे कारण देत धामोरी येथील उपकेंद्रात नेण्याचे सांगण्यात आले. वाघ यांनी अ‍ॅम्बुलन्सची मागणी केली असता वाहनास डिझेल उपलब्ध नसल्याचे सांगितले. अशोक वाघ यांनी आपल्या मुलीला खासगी वाहनातून धामोरी उपकेंद्रात दाखल केले असता बाळाच्या प्रसुतीनंतर अतिरक्तस्रावामुळे काही वेळात रेणुका यांचा मृत्यू झाला. तर चिमुकली सुखरूप आहे. मात्र, जन्माला येताच चिमुकलीचे आईचे छत्र हरपले आहे.

शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वेंच्या मुलावर गुन्हा, मुंबईतील व्यापाऱ्याच्या अपहरणाचा आरोप
या प्रकरणी, माध्यमांमध्ये आलेल्या बातम्या आणि कोपरगावचे तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या पत्रानूसार डॉ. खोत यांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केला नसता तर संबंधीत गरोदर महिलेची वेळेत प्रसूती होवून तिचा जीव वाचला असता. दुसरीकडे चासनळी आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी यांची नेमणूक आहे. मात्र, यापैकी एकही डॉक्टर त्या ठिकाणी हजर नव्हता. यामुळे या ठिकाणी आलेल्या गरोदर मातेला वेळेत प्रसूती सेवा मिळाली नाही.

चासनळीचे वैद्यकीय अधिकारी खोत यांच्यावर कामाचे नियोजन न करणे, गरोदर महिलेला प्रसृतीचे उपचार न मिळाल्याने तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरवत त्यांच्यावर सेवानिलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. डॉ. खोत यांच्या निलंबनाच्या आदेशावर मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांची सही आहे. यासह चासनळीचे दुसर्‍या डॉक्टर साक्षी सेठी व रूग्णवाहिकेचा चालक संजय शिंदे यांच्यावर सेवासमाप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

बाळूमामांच्या दर्शनाला निघाले होते, कार झाडावर आदळली, ४ जणांचा जागीच करूण अंत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here