इस्लामाबाद/जयपूर: राजस्थानच्या अलवरची रहिवासी असलेली अंजू काही दिवसांपूर्वी पाकिस्तानला गेली. फेसबुक फ्रेंडच्या भेटीसाठी अंजू वाघा बॉर्डर क्रॉस करुन पाकिस्तानात पोहोचली. त्यानंतर तिची तुलना पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमाशी होऊ लागली. त्यावर अशी तुलना योग्य नाही. मी दोन दिवसांत मायदेशी परतणार आहे. मी इथे लग्न करण्यासाठी आलेले नाही, असे दावे अंजूनं केले. पण हे सगळे दावे फोल ठरले. फेसबुक फ्रेंड नसरुल्लाहसोबत निकाह करुन अंजूनं धर्म स्वीकारला. मात्र आता अचानक तिचे सूर बदलले आहेत.बीबीसीच्या वृत्तानुसार, अंजूनं भारतात परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ‘मी सध्या पाकिस्तानात खूप खूष आहे. सगळे माझी काळजी घेतात. पण भारतात परतण्याची इच्छा मनात आहे. मला माझ्या मुलांना भेटायचं आहे. मला मुलांची काळजी वाटते. ते खूप चिंतेत आहेत. मला त्यांना भेटायचं आहे,’ असं अंजूनं म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी अंजूच्या मुलीनं संताप व्यक्त केला होता. पुन्हा भारतात येण्याची काही गरज नाही, अशा शब्दांत तिनं तिच्या भावनांना वाट करुन दिली होती. भारतात जाऊन सगळ्या प्रश्नांना उत्तरं द्यायची आहेत. मी वेगळा विचार करुन पाकिस्तानात आले होते. पण प्रत्यक्षात काहीतरी वेगळंच घडत आहे. घाईघाईत माझ्याकडून काही चुका झाल्या. इथे जे झालं त्यामुळे भारतात माझ्या कुटुंबाला बदनामीचा सामना करावा लागला. त्यांना अवहेलना सहन करावी लागली. माझ्यामुळे त्यांच्यावर ही वेळ आली. त्यामुळे मला वाईट वाटतं. मुलांच्या मनात माझी काय प्रतिमा तयार झाली असेल याचा विचार सारखा मनात येतो, अशा शब्दांत अंजूनं तिच्या भावना मांडल्या. मला कसंही करुन भारतात परतायचं आहे. मला सगळ्याचा सामना करायचा आहे. तिथल्या लोकांच्या प्रश्नांना सामोरं जायचं आहे. मी माझ्या मर्जीनं गेले होते आणि माझ्यासोबत कोणतीही जबरदस्ती झाली नाही. ते माझी व्यवस्थित काळजी घेतात, ही बाब मला लोकांना सांगायची आहे, असं अंजू म्हणाली. पाकिस्तानात येण्याचा निर्णय मी घेतला. तो माझा वैयक्तिक निर्णय होता. पण हे प्रकरण इतकं वाढलं की त्यामुळे खूप मोठा दबाव निर्माण झाला. त्यामुळे मी भारतात परतू शकले नाही. पण मला भारतात जाण्याची इच्छा आहे. मला मुलांना भेटायचं आहे. त्यांची मला खूप आठवण येते. त्यांच्या आठवणीत मी दु:खी आहे, असं अंजूनं सांगितलं.