रघुनाथ मारुती भालेराव ( वय ५). असे सर्पदंशाने मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. हृदय पिळवटून टाकणारी ही घटना असून अनेकांनी याबाबत हळहळ व्यक्त केली आहे. बुधवारी या चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. भोरच्या खानापूर गावात हा प्रकार घडला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भोर तालुक्यात पावसाने उसंत घेतल्याने सध्या वातावरणात उकाडा फार वाढला आहे. त्यामुळे अनेक प्राणी पक्षी गवत-वेलींचा आधार घेत आहेत. त्यामुळे मानवी परिसरातही त्यांचा वावर वाढला आहे. रघुनाथ हा आपल्या घराच्या शेजारी असणाऱ्या अंगणात बहिणीसोबत खेळत होता. यावेळी अचानक गवतात लपून बसलेल्या सापाने त्याचा चावा घेतला. मात्र, रघुनाथ हा लहान असल्याने खेळण्या-खेळण्यात त्याला सर्पदंश झाल्याचे समजलेच नाही.
मध्यरात्री त्याला त्रास होऊ लागल्याने त्याला भोर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी रघुनाथ याला सर्पदंश झाल्याचे निष्पन्न झाले. त्याला कुटुंबीयांनी तात्काळ पुण्यातील रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. रघुनाथ भालेराव या चिमुकल्याचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याने खानापूर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
ग्रामीण भागात सर्पदंश होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अनेक साप घराच्या अवतीभवती गारव्यासाठी फिरत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे लहान मुलांना खेळताना किंवा मोठ्यांनाही अनेकदा सर्पदंश होतो. लहान मुलांना ते कळत नसल्याने त्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.