घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुणे ते पिंपरी चिंचवड अशा मोठ्या टप्प्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. त्यानंतर उर्वरित स्टेशनचे काम लवकर सुरु करण्याच्या प्रयत्नात सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे.
येरवडा भागात मेट्रो स्टेशनचे काम सुरु असताना एक लोखंडी भाग खालून जाणाऱ्या कारवर पडला. हा लोखंडी भाग एखाद्या पादचारी अथवा दुचाकीस्वाराच्या डोक्यात पडला असता, तर मोठा अनर्थ घडला असता. सुदैवाने चारचाकीच्या बोनेटवर हा लोखंडी भाग पडल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यामुळे मेट्रो सुरु करण्याच्या घाईमुळे लोकांच्या जीवाला वेठीस धरला जात आहे का? असा सवाल तिथे उपस्थित प्रत्यक्षदर्शी काल रात्री करत होते.
मेट्रोच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी घडलेल्या घटनेबाबत दुजोरा दिला आहे. नेमकी ही घटना कशामुळे घडली याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. मेट्रोचे जनसंपर्क अधिकारी हेमंत सोनवणे म्हणाले, पुण्यातील येरवडा भागात मेट्रो स्टेशनचे काम सुरु आहे. ही घटना नेमकी कशामुळे घडली, या पाहणी करण्यासाठी अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. आम्ही त्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना केलेल्या आहेत. चौकशीनंतर नेमकी ही घटना कशी घडली, याची माहिती समोर येईल. सध्या या व्यतिरिक्त कोणतही माहिती आमच्याकडे नाही