एसआयपीचे आकर्षण कशामुळे?
म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून विविध कंपन्यांचे समभाग अप्रत्यक्षरीत्या खरेदी करता येतात. प्रत्येक फंडाची योजना विशिष्ट क्षेत्रांतील समभागांमध्ये गुंतवणूक करते. ही क्षेत्रे निश्चित करण्याची, तसेच कंपन्यांची निवड करण्याची जबाबदारी फंड व्यवस्थापकाकडे असते. सामान्य गुंतवणूकदाराच्या वतीने हा व्यवस्थापक फंडाच्या विशिष्ट योजनेत पैसे गुंतवतो. या गुंतवणुकीचे मोजमाप युनिट्सच्या स्वरूपात आपल्यापर्यंत येते. या युनिट्सचे निव्वळ मत्तामूल्य (एनएव्ही) दररोज बदलत राहते. बदलत्या एनएव्हीमुळे युनिटची किंमत वरखाली होते. किंमत वाढलेली असताना युनिट विकले, तर या गुंतवणुकीतून लाभ होतो. हा सगळा खटाटोप तुलनेने कमी जोखमीचा होतो. यासाठीच एसआयपीबद्दलचे आकर्षण वाढत आहे.
फायदे कोणते?
सर्वांत मोठा फायदा म्हणजे रोज चढउताराचा मागोवा घेत बसावे लागत नाही. दरमहा ठराविक रक्कम म्युच्युअल फंड गुंतवत राहतो. त्यामुळे बाजारातील चढउतारांची चिंता वहावी लागत नाही. एसआयपीमुळे नियमित गुंतवणुकीची सवय लागते. खर्चण्यायोग्य पैशांच्या (डिस्पोझेबल इन्कम) गुंतवणुकीसाठी एसआयपी उपयोगी पडते. नियमित तारखेला बँक खात्यातून रक्कम गुंतवण्याची व्यवस्था करता येते. किमान ५०० रुपयांपासून सुरुवात करता येत असल्याने ऐपतीनुसार दरमहा गुंतवणुकीची रक्कम निश्चित करता येते. होते. यास्तव एसआयपी ‘कॉस्ट इफेक्टिव्ह’ ठरते. कारण चलनवाढीसारख्या आर्थिक घडामोडींचा यावर परिणाम होत नाही. याखेरीज, एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडाकडे दिली जाणारी रक्कम अप्रत्यक्षरित्या विविध क्षेत्रांतील कंपन्यांत गुंतवली जाते. ही गुंतवणूक फंडाने केलेल्या अभ्यासानुसार होत असल्यामुळे याचे व्यवस्थापन काटेकोर होते. याचा दीर्घकालीन लाभ नक्की मिळतो.
मर्यादा कोणत्या?
एसआयपीद्वारे केलेल्या गुंतवणुकीतून मिळणारा परतावा, हा थेट समभाग खरेदीवर मिळणाऱ्या परताव्याच्या तुलनेत कमी असतो. एसआयपी किती तारखेला सुरू करावी, याबाबत मर्यादित विकल्प असतात. उदाहरणार्थ, साधारणतः दरमहा पहिल्या, पाचव्या, सातव्या, दहाव्या, १५व्या अशा तारखांना एसआयपी करावी, असा सल्ला म्युच्युअल फंड देतात. आधी ठरवलेली रक्कमच तुम्हाला ती एसआयपी सुरू असेपर्यंत गुंतवावी लागते. एसआयपी सुरू किंवा बंद करण्यासाठी केलेला अर्ज आणि त्याची अंमलबजावणी यात कालापव्यय होऊ शकतो. ज्याचे उत्पन्न अनियमित आहे, अशांसाठी हा पर्याय अनेकदा योग्य नसतो.
एसआयपी कुणी करावी?
प्रथमच शेअर बाजारात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांनी एसआयपी आवर्जून करावी. त्याचप्रमाणे वेतनधारक, नोकरदार किंवा ज्यांचे उत्पन्न ठराविक तारखेला येणारे आहे, अशांनीही एसआयपी करावी. दीर्घकाळ नियमित गुंतवणुकीची सवय स्वतःला लावून घेण्यासाठी एसआयपी करावी.
इतके महत्त्व का वाढले?
शेअर बाजारात डिमॅट खात्यांची संख्या वाढण्यास करोनासंसर्ग आणि लॉकडाउन कारणीभूत ठरले. लॉकडाउन किंवा ‘वर्क फ्रॉम होम’च्या काळात लोकांचा वेळ वाचू लागला. या वेळेचा सदुपयोग अनेकांनी शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी किंवा शेअर बाजार शिकण्यासाठी केला. यामुळे म्युच्युअल फंडांकडे ओढा वाढला. साहजिकच हा ओघ एसआयपीच्या माध्यमातून वाढू लागला. यावर्षी एप्रिल ते जुलै या काळात ६.८० कोटी एसआयपी खाती झाली असून याद्वारे ५८ हजार ४५६ कोटी रुपयांची गुंतवणूक म्युच्युअल फंडांत आली. व्यापक स्तरावर विचार करता काही तोटे असले, तरी दीर्घकाळ गुंतवणूक करण्यासाठी चिंतामुक्त पर्याय म्हणून एसआयपीकडे पाहता येते. अर्थात, असे करण्यापूर्वी आपण जो म्युच्युअल फंड निवडणार आहोत, त्याची माहिती घेण्यास विसरू नये.