लंडन: समुद्र किनारी भान हरपून मौजमजा करताना लाटांच्या प्रवाहात लोक वाहून गेल्याचे अनेक व्हिडिओ समोर येत असतात. तरीही लोक त्यातून कुठलाही धडा घेत नाहीत. असंच काहीसं या तरुणीसोबत घडलं आहे. इंग्लंडमधून एक धडकी भरवणारा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये काही लोक समुद्रकिनारी बांधलेल्या उतारावर उभे राहून समुद्राच्या लाटांचा आनंद घेताना दिसत आहेत. भल्या मोठ्या लाटा त्या उतारावर येऊन आदळत आहेत. त्याच उताऱ्यावर असलेल्या रेलिंगच्या आधारे लोक उभे होते. मात्र, तेवढ्यात एका तरुणीसोबत भयंकर घडतं. हा व्हिडिओ पाहून कुणाच्याही अंगावर काटा उभा राहिल. हा व्हिडिओ डेव्होन, युनायटेड किंगडम येथील आहे. यामध्ये एक तरुणी या उतारावर उभी होती. ती रेलिंगला पकडून उभी होती. दरम्यान, समुद्राच्या मोठ्या लाटा तिथे धडकत होत्या. तेव्हा तिथे उभ्या काहींनी पळ काढला, पण ही तरुणी तितेच उभी होती. अनेकांनी तिला आवाज दिला, मागे येण्यास सांगितलं पण तिने कुणाचंही काही ऐकलं नाही. तेवढ्यात एक जोरदार लाट आली आणि ती तरुणी पाण्यात वाहून गेली. लाटेच्या धडकेने जेव्हा ती पडली तेव्हा तिने रेलिंगचा खालचा भाग पकडून ठेवला. मात्र, काहीच क्षणात तिचा हात सुटला आणि ती पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. हे घडताना पाहून अनेकजण आरडाओरड करु लागले, तिथे एकच गोंधळ माजला. कुणीतरी तिला वाचवा हेच सगळे बोलू लागले. तर काहींनी तिला आवाज देत पोहून किनारी येण्यास सांगितलं. दरम्यान, एका व्यक्तीने जीव मुठीत घेऊन तिचा जीव वाचवला. दैव बलवत्तर म्हणून तिचा जीव वाचला असंच म्हणावं लागेल. ही धोकादायक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या घटनेत त्या मुलीला आणि काही जणांना किरकोळ दुखापत झाली असली तरी त्यातून आयुष्यभर विसरणार नाही असा धडा नक्की मिळाला आहे. नॉर्थ डेव्हॉन काऊन्सिलने तातडीच्या इशाऱ्यासह हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे आणि लोकांना हाय टाइडवेळी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. “समुद्राची परिस्थिती बदलणारी आणि अस्थिर असू शकते, कृपया किनाऱ्यावर नेहमी सावधगिरी बाळगा”, असं काऊन्सिलने लिहिले आहे.