सायमन हा कुख्यात वाहनचोर आहे. त्याच्याविरुद्ध वाहनचोरीचे पाच पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. तीन दिवसांपूर्वी अजनी पोलिसांनी वाहनचोरीच्या प्रकरणात सायमन याला अटक केली. त्याची पोलिस कोठडी घेतली. पोलिस कोठडी संपल्यानंतर अजनी पोलिसांनी त्याला पुन्हा अन्य एका चोरीच्या प्रकरणात अटक करून पोलिस कोठडी घेतली. रविवारी पोलिस कोठडी संपल्याने अजनी पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीअंतर्गत कारागृहात रवानगी केली. पोलिस त्याला घेऊन कारागृहात आले. प्रक्रिया पूर्ण करून सायमन याला कारागृहातील अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केले. कारागृह परिसरातील मंगलमूर्ती लॉनमधील सभागृहात कारागृहाचे जवान त्याची झडती घेत होते. याच दरम्यान संधी साधून सायमन पसार झाला. जवानांनी त्याचा पाठलाग केला. मात्र अजनी चौकातून तो बेपत्ता झाला. या घटनेने कारागृह प्रशासन व पोलिसांमध्ये खळबळ उडाली. शहरात नाकेबंदी करण्यात आली. पोलिस त्याचा शोध घेत आहे. याबाबत धंतोली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप लांडगे यांच्याशी संपर्क साधला असता याबाबत काहीच माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.
कारागृहातून यापूर्वीही पाच कुख्यात कैद्यांनी पलयान केले आहे. रविवारीही कुख्यात चोरट्याने पलायन केले. गंभीर घटनेची धंतोली पोलिसांना माहिती नसल्याचे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times