राज ठाकरे यांचा एक ताजा फोटो व्हायरल झाला असून त्यात राज यांनी दाढी वाढवून त्याला खास शेप दिल्याचे दिसत आहे. दाढी राखलेले राज ठाकरे टीशर्ट आणि गॉगलमुळे एका वेगळ्याच आकर्षक लूकमध्ये पाहायला मिळत आहेत. या लूकवर राज यांची अद्याप कोणतीच प्रतिक्रिया आलेली नसली तरी राज यांचा नव्या लूकमधील फोटो तुफान व्हायरल झाला आहे. राज यांच्या नव्या लूकची चर्चाही जोरदार रंगली आहे.
दिवंगत यांचं बोट धरून राज ठाकरे राजकारणात आले होते. नंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा वेगळा पक्ष स्थापन करून राज यांनी वेगळा राजमार्ग चोखाळला असला तरी राज यांच्या वागण्या बोलण्यात नेहमीच बाळासाहेबांची झलक पाहायला मिळत असते. आताही राज यांच्या नव्या लूकने त्याचा प्रत्यय आला आहे. बाळासाहेबांनी नंतरच्या काळात दाढी ठेवायला सुरुवात केली होती. नंतर दाढीतला लूक चांगला दिसतो म्हणून बाळासाहेबांनी दाढी कायमची ठेवली. आता राज यांनी दाढी ठेवल्याने येत्या काळात राज भारदस्त दाढीत दिसणार का?, अशी चर्चाही रंगू लागली आहे.
दरम्यान, राज ठाकरे यापूर्वीही अनेकदा हटके लूकमुळे चर्चेत राहिले आहेत. राज यांनी काही वर्षांपूर्वी लांब केस वाढवले होते. तेव्हाचा त्यांचा लूक फार चर्चेत आला होता. जानेवारी महिन्यात मुंबईत मनसेचं महाअधिवेशन झालं. या अधिवेशनातील राज यांचा लूकही चर्चेचा विषय ठरला होता.
इफेक्ट
लॉकडाऊन काळात सर्व सलूनला टाळे होते. त्यामुळे केस कापण्याची आणि दाढी करण्याची मोठी गैरसोय झाली होती. त्यात अनेकांनी घरच्या घरीच डोक्यावरचा भार हलका केला. त्यात अनेकांना घरच्यांचीही साथ मिळाली. त्यातही अपघाताने वाढलेली दाढी चांगली दिसत असल्याचे पाहून ती राखणाऱ्यांचाही आकडा वाढला. त्यातून मग डीपीवर दाढीवाले चेहरे झळकू लागले. याच लॉकडाऊन काळात राज यांचा दाढी ठेवलेला नवा लूक समोर आला असून राज यांची दाढी असल्याने त्याची चर्चा तर होणारच आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times