म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : ‘महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी बडोदा संस्थानात स्त्रियांच्या उत्कर्षासाठी महत्त्वपूर्ण कायदे केले. ते दीनदुबळ्यांचे, स्त्रियांचे कैवारी होते. देशात आज स्त्रियांवरचे अत्याचार पाहता लाज वाटावी अशी परिस्थिती आहे. पिंपरी-चिंचवडमधून दर वर्षी ३०० मुली पळविल्या जातात. आसामच्या मुलींची घरकाम करण्यासाठी विक्री होते. लाखो स्त्रियांवर अत्याचार होतात. प्रत्येक जाती-जमातीच्या कायद्यांचे केंद्रीकरण झाल्याने स्थिती भयावह झाली आहे. मणिपूरची परिस्थिती पाहता प्रत्येकासाठी स्वतंत्र कायद्याची गरज आहे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी केले.महाराजा सयाजीराव गायकवाड संशोधन व प्रशिक्षण संस्था आणि महात्मा गांधी मिशन विद्यापीठ यांच्या वतीने बाबा भांड लिखित-संपादित ‘सार्वभौम महाराजा सयाजीराव-स्वातंत्र्यवीरांचे पाठीराखे’ या त्रैभाषिक पुस्तकाचे शुक्रवारी रुक्मिणी सभागृहात प्रकाशन करण्यात आले. या वेळी बडोद्याच्या राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड, डॉ. भालचंद्र नेमाडे, कुलपती अंकुशराव कदम आणि ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ डॉ. उमेश बगाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. सयाजीराव यांच्या कार्यावर नेमाडे यांनी भाष्य केले.‘माझ्या देशीवादाच्या कल्पना सयाजीरावांच्या विचारातून आल्या आहेत. आपल्या देशातला नीट विचार करणारा हा राजा होता. त्यांनी सूर्य मावळत नाही अशी अधिकारवृत्ती असलेल्या ब्रिटिश साम्राज्याला आव्हान दिले. ब्रिटिशांनी एवढी पापे केली की त्यांना काही फाइल बंद ठेवाव्या लागल्या. पण, आपलाही मूर्खपणा बाहेर येऊ द्या म्हणून काही अभ्यासक फायलींचा अभ्यास करीत आहेत. या पंधरा फायलींमधून सयाजीरावांनी क्रांतिकारकांना केलेल्या मदतीचे तपशील मिळतात. त्यांनी सामाजिक सुधारणा अधिक केल्या होत्या. पण, इतिहासात त्यांचा उल्लेखही नव्हता. या मोठ्या माणसांची छटा तुमच्या ज्ञानात नसेल, तर काही खरे नाही,’ असे नेमाडे म्हणाले.‘बडोदा आणि कोल्हापूर संस्थानात परिवर्तनाची अमोघ शक्ती आणि समर्पणाची वृत्ती होती. जहालवादाच्या प्रभावाखालील क्रांतीकारक बडोद्यात होते. राजद्रोहाच्या कायद्याचा ब्रिटिशांनी स्वैर वापर केला. पण, ७५ वर्षांनंतरही देशात स्वातंत्र्याला बेदखल करणारा हा कायदा लागू आहे. हा ग्रंथ समकालीन परिस्थितीचा विचार करायला भाग पाडतो. महाराष्ट्र स्वातंत्र्याची प्रेरणा असलेली भूमी असून, सयाजीराव त्या प्रेरणेचे भोक्ते होते,’ असे डॉ. उमेश बगाडे म्हणाले. ‘सयाजीरावांच्या कर्तृत्व आणि योगदानाकडे देशाने दुर्लक्ष केले. ब्रिटिश लायब्ररीतून पंधरा फाइल मिळाल्यामुळे स्वातंत्र्य चळवळीवर नवा प्रकाश टाकता आला,’ असे बाबा भांड प्रास्ताविकात म्हणाले. लेखन प्रकल्पासाठी सहकार्य करणारे राहुल मगर, प्राचार्य एम. एम. तांबे, शाहीर अजिंक्य लिंगायत आणि संतोष पाटे यांचा सत्कार करण्यात आला. सारंग टाकळकर यांनी सूत्रसंचालन केले आणि शिव कदम यांनी आभार मानले.भिल्ल राष्ट्र का नाही ?मल्याळमपेक्षा भिल्ली भाषा बोलणारे लोक जास्त आहेत. पण, दुर्दैवाने भिल्ल राज्याची निर्मिती झाली नाही. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि आंध्र प्रदेशात भिल्ल आहेत. ते सर्वजण राष्ट्रप्रेमी होते. शेवटपर्यंत त्यांनी ब्रिटीशांच्या विरोधात लढा दिला होता. त्यांना परका माणूस आवडत नव्हता. भाषा वेगळी असूनही त्यांचे राज्य झाले नाही. सनदी नोकरांचीच राज्ये अस्तित्वात आली, असे नेमाडे म्हणाले.‘सयाजीरावांचे कार्य जगासमोर’‘कल्याणकारी राजे असलेल्या सयाजीरावांनी लोकशाहीची पायाभरणी केली आणि बडोदा ज्ञानप्राप्तीचे केंद्र झाले. स्वातंत्र्यलढ्यात योगदान देऊनही सयाजीरावांचे कार्य इतिहासात अदृश्य राहिले. हा अज्ञात इतिहास बाबा भांड यांनी शोधला आणि जगासमोर आणला. या व्यापक प्रयत्नामुळे वेगवेगळ्या भाषांत सयाजीरावांचे कार्य पोहचेल,’ असे राजमाता शुभांगिनीराजे म्हणाल्या.२) दरोड्याचा प्रयत्न फसलाम. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्या सतर्कतेमुळे चिकलठाणा हद्दीत दरोड्याचा प्रयत्न फसला. एका ट्रकचालकाने दिलेल्या माहितीवरून, चिकलठाणा पोलिसांनी पाठलाग करून तीन आरोपीच्या मुसक्या आवळल्या.अजय नितीन कटकटे (वय २४, रा. खोकडपुरा), सागर मधुकर आढाव (वय २३, रा.खंडोबा मंदिराजवळ), मनोहर लक्ष्मण ससे (वय २०, रा. राजनगर, मुकुंदवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहे. त्यांच्या चारचाकी वाहनाची (एमएच ०६ एझेड १६७७) झडती घेतली असता, त्यात एक लोखंडी पहार, मिरची पूड, नॉयलॉन दोरी, चाकू, स्क्रू ड्रायव्हर, असे दरोड्याचे साहित्य आढळल्याचे पोलिसांनी सांगितले.धुळे-सोलापूर महामार्गावर झाल्टा फाट्याजवळ काही संशयित व्यक्ती बळजबरीने ट्रक थांबवून ट्रकचालकांना धमकी देऊन, मारहाण करून बळजबरीने पैसे मागत आहेत, अशी माहिती एका ट्रकचालकाने मध्यरात्री अडीचच्या सुमारास ग्रामीण पोलिसांच्या डायल ११२ या आपत्कालीन क्रमांकावर दिली.माहिती प्राप्त होताच पोलिस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांनी गस्तीचे वाहन झाल्टा फाट्याचे दिशेने वळविले. यादरम्यान त्यांनी माहिती देणाऱ्या ट्रकचालकास संपर्क साधला असता. मात्र, तातडीने पुढे जायचे असल्याने, तसेच घाबरल्यामुळे तिथे न थांबता वेगाने पुढे रवाना झाल्याचे त्याने सांगितले. या दरम्यान चिकलठाणा पोलिसांचे गस्ती वाहन झाल्टा फाट्याचे दिशने येत असल्याचे संशयित आरोपींना समजताच त्यांनी देवळाईच्या दिशेने त्यांचे चारचाकी वाहन वेगाने नेले. त्या वेळी पोलिसांनी आरोपींचा पाठलाग सुरू केला. पोलिस आणि संशयित यांचा पाठशिवणीचा हा खेळ रात्री पावणेचार वाजेपर्यंत सुरू होता. यादरम्यान देवळाई जवळील हॉटेल सोनिया नजीक पोलिस वाहनाने आरोपींच्या वाहनास हुलकावणी देऊन रस्त्याच्या खाली उतरवण्यास भाग पाडले. या वेळी पोलिसांशी झटापट करून अंधारात दोन आरोपी पसार झाले, तर तीन जणांना पोलिसांनी अटक केली.या प्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांकडील चारचाकी वाहन जप्त करण्यात आले असून, वाहन झडतीत दरोड्याचे साहित्य आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींकडील चारचाकी वाहन चोरीचे असल्याचा कयासदेखील पोलिसांनी व्यक्त केला. पोलिस निरीक्षक रवींद्र खांडेकर, पोलिस अंमलदार दीपक देशमुख, विशाल लोंढे, अशोक मुळे यांनी ही कारवाई केली.३) शहर बसची चावी नागरिकाने पळवलीम. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : शहर बसची चावी एका व्यक्तीने काढून नेली. रस्त्याच्या मधोमध उभ्या या बसमुळे वाहतूक कोंडी झाली आणि ती पूर्ववत करण्यासाठी पोलिसांना सुमारे एक तास मोठी कसरत करावी लागल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी सिडको ११ परिसरातील जळगाव रोड ते टीव्ही सेंटर रोडवरील जाधववाडी सिग्नलनजीक घडली.एक सिटी बस प्रवाशांना घेऊन जात असतानाच जाधववाडी सिग्नल नजीक एका व्यक्तीने बसचालकाशी वाद घातला आणि संधी साधून बसची चावी लंपास केली. चावीअभावी बस सुरू करता येईना. त्यामुळे नाईलाजाने बस रस्त्यात उभी करावी लागली. वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असताना त्यात उभ्या या बसमुळे वाहतूक व्यवस्थेचे काही मिनिटांत तीनतेरा वाजले.शरद हॉटेलपासून ते एम टू रोड, सौभाग्य मंगल कार्यालय आदी परिसरात वाहतूक कोंडी झाली. ही बाब समजाताच सिडकोसह वाहतूक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. सुमारे एक ते सव्वा तास पोलिसांनी केलेल्या अथक प्रयत्नामुळे शेवटी वाहतूक सुरळीत झाली. दरम्यान, चालकाने दुसरी चावी आणून बस सुरू करीत प्रस्थान केले. बस उभी का केली होती, याबाबत पोलिसांनी विचारणा केली असता चालकाने एका व्यक्तीने बसची चावी काढून नेल्याचे नमूद केले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
Home Maharashtra Chhatrapati Sambhajinagar News LIVE : भारतात स्त्रियांची स्थिती लाजीरवाणी : भालचंद्र नेमाडे